पाथर्डी (नगर) येथील मढी येथे श्री कानिफनाथ यांचा वाढदिवस केक कापून साजरा !
|
पाथर्डी (नगर) – येथील मढी येथे नवनाथांपैकी असलेल्या श्री कानिफनाथ यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. ही घटना प्रत्यक्षात १२ ऑगस्ट २०२१ या दिवशीची असली, तरी ती आता ७ मासांनंतर उघडकीस आली आहे. मुळात नवनाथ हे प्रगट झालेले असल्याने त्यांचा जन्मदिनांक किंवा तिथी यांविषयी कोणतीही पोथी किंवा पुराण यांत उल्लेख नाही. असे असतांनाही मढी देवस्थानच्या विश्वस्तांनी नाथांच्या समाधीस्थळाच्या आकाराचा केक आणून तो का कापला ?, असा प्रश्न या देवस्थानचे माजी विश्वस्त मुंबई येथील सुनील सानप आणि नगर येथील डॉ. रमाकांत मडकर यांनी १७ मार्च या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
‘नाथसंप्रदायाचा अभ्यास नसलेल्या मंडळींची विश्वस्त म्हणून नेमणूक केल्यास असे चुकीचे प्रकार घडणारच’, अशी टीकाही सानप यांनी या वेळी केली.
देवस्थातील गैरकारभाराविषयी सुनील सानप आणि नगर येथील डॉ. रमाकांत मडकर म्हणाले,
१. मढी देवस्थानच्या कारभारावर आम्ही अनेक आक्षेप नोंदवले असून त्याविषयी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे तक्रारी प्रविष्ट केल्या आहेत; मात्र त्यांची नोंद घेतली जात नाही.
२. औरंगाबाद खंडपिठात देवस्थानच्या विश्वस्त निवडीविषयी याचिका प्रविष्ट केली आहे; मात्र नगरच्या धर्मादाय उपायुक्त कार्यालयाच्या निकालावर खंडपिठाच्या याचिकेचे कामकाज होणार आहे. त्यामुळे विश्वस्त मंडळ नियुक्त करून खंडपिठाचा अवमान केल्याची तक्रार आम्ही पुढच्या सुनावणीच्या वेळी करणार आहोत. मढी देवस्थानातील गैरकारभाराची चौकशी करावी, अशी तक्रार मुंबईच्या मुख्य धर्मादाय आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
३. कोरोनाच्या काळात दळणवळण बंदीमुळे देवस्थान बंद असतांना झालेली नोकरभरती, केलेला अवास्तव खर्च, देवस्थानच्या पैशांतून मढी ग्रामपंचायतीची झालेली विकासकामे, देवस्थानजवळील अतिक्रमणे आदींच्या संदर्भात गैरव्यवहार झाला आहे.
४. देवस्थानची वार्षिक उलाढाल अनुमाने तीन ते साडेतीन कोटी रुपयांची आहे. आम्ही तेथे चालू असलेल्या गैरकारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. त्यावर मुख्य धर्मादाय आयुक्तांनी पुण्याच्या सहआयुक्तांना चौकशीचा आणि आवश्यक कारवाई करण्याचा आदेश देऊन तक्रारदारांना कळवण्यास सांगितले होते; परंतु आम्हाला आजपर्यंत काहीही कळवले गेलेले नाही.
गैरकारभाराच्या विरोधात आंदोलन करणार !
या गैरकारभाराच्या विरोधात सानप यांनी १७ मार्च या दिवशी आत्मदहन करण्याची चेतावणी दिली होती; पण जिल्हाधिकार्यांनी सण-उत्सवानिमित्त ५ दिवस जमावबंदी आदेश घोषित केल्याने सानप यांनी आंदोलन स्थगित केले. ८ ते १० दिवसांनंतर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
(साभार : ‘दैनिक लोकमंथन’, नगर)