जगातील १४६ सर्वांत आनंदी देशांच्या सूचीमध्ये भारत १३६ व्या, तर पाकिस्तान १२१ व्या स्थानी !

संयुक्त राष्ट्रांचे अजब निरीक्षण !

यावरून या सूचीची विश्‍वासार्हता किती आहे, याचा विचार करणे आवश्यक आहे ! पाश्‍चात्त्य देशांचा प्रभाव असणार्‍या संयुक्त राष्ट्रांकडून बनवण्यात येणार्‍या अशा सूचींद्वारे नेहमीच भारताला हीन लेखण्याचा प्रयत्न केला जातो, हे लक्षात येते ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्रांकडून प्रतिवर्षी जगातील सर्वांत आनंदी देशांची सूची घोषित केली जाते. यात सलग पाचव्या वर्षी फिनलँडला जगातला सर्वांत आनंदी देश होण्याचा मान मिळाला आहे. फिनलँडच्या पाठोपाठ डेन्मार्क, आईसलँड, स्वित्झर्लंड, नेदरलँड, लग्झेंबर्ग, स्विडन, नॉर्वे, इस्रायल आणि न्यूझीलंड या ९ देशांचा क्रम लागतो. या सूचीमध्ये अफगाणिस्तान सर्वांत शेवटच्या म्हणजेच १४६ व्या स्थानी आहे. विशेष म्हणजे भारत या सूचीमध्ये १३६ च्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तान भारताच्या पुढे म्हणजे १२१ व्या क्रमांकावर आहे. वर्ष २०२२ ची सूची बनवतांना एकूण १४६ देशांचे मूल्यमापन करण्यात आले आहे. यामध्ये रशिया ८० व्या आणि युक्रेन ९८ व्या स्थानावर आहेत.

ही सूची सिद्ध करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या गटाकडून विशिष्ट पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. भ्रष्टाचाराविषयी नागरिकांचे मत, आयुष्यात सकारात्मक पालट घडवून आणण्याचे स्वातंत्र्य, आयुर्मान, सामाजिक पाठिंबा, जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पन्न), रहाण्याच्या ठिकाणाविषयीचे समाधान अशा काही गोष्टींचे मूल्यमापन ही सूची बनवतांना केले जाते.