फुटीरतावादी यासिन मलिक, शब्बीर शाह आदींवर गुन्हा नोंदवा ! – न्यायालयाचा आदेश
या फुटीरतावाद्यांना आतापर्यंत कठोर शिक्षा होणे अपेक्षित असतांना आता कुठे त्यांच्यावर गुन्हे नोंद होणार असतील, तर ‘या प्रकरणांचा निकाल किती वर्षांनी लागेल आणि शिक्षा कधी होईल ?’, हा प्रश्नच आहे ! – संपादक
नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या न्यायालयाने जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी कारवायांसाठी अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणी फुटीरतावादी यासिन मलिक, शब्बीर शाह, मसरत आलम यांच्यासह लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेचा संस्थापक हाफिज सईद, हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन आणि अन्य काही जण यांच्या विरोधात ‘बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायद्या’च्या अंतर्गत (‘युएपीए’च्या अंतर्गत) गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला आहे.
Delhi court frames charges against Jammu & Kashmir Liberation Front chief Yasin Malik under UAPAhttps://t.co/2bIor2C1LB
— OpIndia.com (@OpIndia_com) March 18, 2022
१. माजी आमदार रशिद इंजिनिअर, व्यावसायिक जहूर अहमदशाह वताली, बिट्टा कराटे, अफताब अहमद शाह, अवतार अहमद शाह, नईम खान, बशीर अहमद भट उपाख्य पीर सौफुल्ला आणि इतर अनेकांचा या प्रकरणात सहभाग आहे. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात येणार आहे.
२. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने न्यायालयाला सांगितले, ‘जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादासाठी पाकमधून अर्थपुरवठा होत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय आतंकवादी हाफिज सईद यांच्यासारख्यांचाही यामध्ये हात आहे. तसेच लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिदीन, जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंट आणि जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनांचाही सहभाग असून त्यांना पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय. पाठिंबा आहे. काश्मीर खोर्यात नागरिकांवर आणि सुरक्षारक्षकांवर आक्रमण करून हिंसाचार घडवणे हा यांचा हेतू आहे.’