होळी अन् रंगपंचमी यांच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे आवाहन !
मुंबईतील भोईवाडा, काळाचौकी आणि भायखळा पोलीस ठाण्यांत निवेदन !
मुंबई, १८ मार्च, (वार्ता.) – होळी आणि रंगपंचमी निमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबईतील भोईवाडा पोलीस ठाणे, काळाचौकी पोलीस ठाणे आणि भायखळा पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले. होळी आणि रंगपंचमी यांच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना त्रास होईल, अशा पद्धतीने रंग खेळणे, मार्गस्थ आणि महिलांवर पाण्याचे फुगे मारणे, सार्वजनिक मद्यपान आणि धुम्रपान करणे असे अपप्रकार होत असतात. याचा नागरिकांना आणि महिलांना त्रास होत असतो. हे रोखण्यासाठी पोलिसांनी गस्तीपथके सिद्ध करावीत, या संदर्भात कारवाईसाठी पोलिसांच्या वतीने सूचना निर्गमित करण्यात याव्यात, अपप्रकार करणार्यांना कह्यात घ्यावे आणि प्रबोधनपर हस्तपत्रके वितरीत करावीत. विशेषतः महिलांच्या सुरक्षेविषयी सतर्क राहावे, अशा मागण्या या निवेदनात केलेल्या आहेत. या वेळी काळाचौकी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस निरीक्षक श्रीमती मुजावर म्हणाल्या, ‘‘समितीचा उपक्रम चांगला आहे. ‘निवेदनाचे छायाचित्र काढून जागृतीसाठी तो सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यास आमच्या लेखनिकांना सांगा.’’