राज्यपालांनी निलंबन मागे घेतले नसल्याचे राजभवनाकडून स्पष्टीकरण !
नगर जिल्हा रुग्णालयातील अग्नीकांडप्रकरणी डॉ. पोखरणा यांच्या निलंबनाचे प्रकरण !
मुंबई – डॉ. पोखरणा यांचे निलंबन रहित करण्यात आल्याचे वृत्त खोटे आहे. डॉ. पोखरणा यांचे निलंबन रहित करण्यासाठी राज्यपालांनी कुठल्याही विशेषाधिकाराचा वापर केलेला नाही, असे स्पष्टीकरण राजभवनाकडून प्रसारित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियमातील तरतुदीनुसार डॉ. सुनील पोखरणा यांनी २५ जानेवारी २०२२ या दिवशी स्वत:च्या निलंबनाच्या विरोधात राज्यपालांकडे तक्रार केली होती. यावर १६ मार्च २०२२ या दिवशी राजभवनात सुनावणी झाली. शासनाच्या वतीने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती नीलिमा केरकट्टा या वेळी उपस्थित होत्या. डॉ. पोखरणा यांचे निलंबन १५ मार्च या दिवशीच रहित करून त्यांची शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे सुनावणीच्या वेळी श्रीमती केरकट्टा यांनी सांगितले. त्यामुळे राज्यपालांच्या आदेशावरून डॉ. पोखरणा यांचे निलंबन रहित करण्यात आल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे राजभवनातून स्पष्ट करण्यात आले आहे.
नगर जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतीदक्षता विभागात ६ नोव्हेंबर २०२१ या दिवशी आग लागून १४ रुग्णांचा मृत्यू झाला. या अग्नीकांडाचा ठपका ठेवून रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यावर शासनाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. डॉ. पोखरणा यांना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विशेषाधिकार वापरून डॉ. पोखरणा यांचे निलंबन मागे घेतले असल्याच्या बातम्या काही प्रसिद्धीमाध्यांवरून प्रसारित करण्यात आल्या होत्या. याविषयी राजभवनाकडून वरील स्पष्टीकरण देण्यात आले आहे.