मुंबईतील विहिरींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ !
भूजल संसाधन क्षमतेचा अभ्यास करून पाणीवापराचे धोरण निर्धारित करण्यात येणार !
मुंबई, १८ मार्च (वार्ता.) – वर्ष २०२१ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मुंबईमध्ये एकूण ४ सहस्र ७१० विहिरी आढळल्या आहेत. त्यानंतर डिसेंबर २०२१ पर्यंत एक वर्षाच्या कालावधीत महानगरपालिकेने आणखी १२ सहस्र ९५४ कुपनलिका आणि १ सहस्र ७४७ कंगण विहिरी यांना अनुमती दिली आहे. मुंबईतील भूजल संसाधनांची वाढती संख्या लक्षात घेऊन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करून पाण्याच्या वापराचे धोरण निर्धारित करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
मुंबई शहर आणि उपनगर येथे विहिरींतील पाण्याच्या चोरीविषयी तारांकीत प्रश्नाद्वारे विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. एकनाथ शिंदे यांनी १७ मार्च या दिवशी यावर लेखी उत्तर दिले आहे. शिंदे यांनी उत्तरात म्हटले आहे की, मुंबईमध्ये विविध ठिकाणांतील विहिरींतून अवैधरित्या पाण्याचा उपसा केला जात आहे. मुंबईतील एका विहिरीतून ८० कोटी रुपयांच्या पाण्याची चोरी झाल्याची तक्रार एका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. वर्ष २०२१ मध्ये २५१ विविध प्रकारच्या विहिरींमधून अवैधरित्या पाण्याचा उपसा करण्यात आल्याप्रकरणी विहिरींच्या मालकांवर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे.
केंद्रीय भूजल विभागाने मुंबईतील विहिरींचे सर्वेक्षण केल्याविषयीची माहिती महानगरपालिकेकडे उपलब्ध नाही.