गुजरातमध्ये शालेय अभ्यासक्रमात श्रीमद्भगवद्गीतेचा समावेश !

गुजरातमधील भाजप सरकारचा निर्णय !

  • गुजरातमधील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! असा निर्णय आता भाजपच्या अन्य राज्यांतील सरकारांनी, तसेच केंद्र सरकारनेही घ्यावा, असेच हिंदूंना वाटते ! यासह अभ्यासक्रमात श्रीमद्भगवद्गीतासह वेद, उपनिषदे आणि अन्य धर्मग्रंथांचाही समावेश करावा, असेही धर्माभिमानी हिंदूंना वाटते ! – संपादक
  • आता पुरो(अधो)गामी, काँग्रेसी आदींनी शिक्षणाचे भगवेकरण होत असल्याची ओरड केल्यास आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक 

कर्णावती (गुजरात) – गुजरात सरकारने पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीता शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात शिक्षणमंत्री जितू वाघानी यांनी ही घोषणा केली.

वाघानी म्हणाले की, केंद्र सरकारने नुकत्याच घोषित केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसारच हे पालट करण्यात आले आहेत. भारतीय संस्कृती आणि ज्ञान व्यवस्था यांचा शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये समावेश करण्यात येणार असून वर्ष २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून हा पालट होईल. श्रीमद्भगवद्गीतेतील मूल्य आणि तत्त्व प्राथमिक स्तरावर इयत्ता ६वी ते १२वीच्या वर्गांमध्ये शिकवले जातील. गीतेतील श्‍लोक ‘सर्वांगी शिक्षण’ पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. इयत्ता ९वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांनी प्राथमिक भाषेमधून गोष्टीच्या स्वरूपात गीता शिकवली जाईल. यासमवेतच शाळांमध्ये प्रार्थना, श्‍लोकपठण, नाटक, प्रश्‍नमंजुषा, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातूनही श्रमद्भगवद्गीतेचे शिक्षण दिले जाईल.