कर्नाटकातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर विधानसभेत चर्चा !

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत भटक्या कुत्र्यांची समस्या सोडवू न शकलेला एकमेव देश भारत !

बेंगळुरू (कर्नाटक) – बेंगळुरू आणि उर्वरित कर्नाटकातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विधानसभेत यासंदर्भात भाजपचे आमदार रवि सुब्रमण्यम् यांनी प्रश्न उपस्थित केले आणि ‘बेंगळुरूच्या बाहेरील भागात ‘प्राणी निवारा केंद्र’ उभारून रस्त्यांवरील सर्व कुत्र्यांना तेथे तत्काळ हालवणे आवश्यक आहे’, असे सांगितले. त्याला उत्तर देतांना मुख्यमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले, ‘‘गेल्या ४ वर्षांत बेंगळुरूमध्ये १ लाख ७५ सहस्र कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे.’’

सर्वोच्च न्यायालयाच्या कडक निर्देशांमुळे भटक्या कुत्र्यांना हात लावणे अशक्य असल्याचे कायदामंत्री जे.सी. मधुस्वामी यांनी या वेळी सांगितले. माजी मंत्री आणि आमदार एस्. सुरेश कुमार म्हणाले की, कुत्र्यांनाही जगण्याचा अधिकार असला तरी, या विषयाचे गांभीर्य ओळखून यासंदर्भात न्यायालयाच्या निर्देशांवर तोडगा काढण्यासाठी कायद्याचे साहाय्य घ्यायला हवे.