पोलंड, स्लोवेनिया आणि झेक रिपब्लिक या देशांच्या पंतप्रधानांनी जीव धोक्यात घालून गाठले युक्रेन !
कीव (युक्रेन) – युक्रेनने पोलंड, स्लोवेनिया आणि झेक रिपब्लिक या युरोपीय देशांच्या पंतप्रधानांच्या शौर्याचे कौतुक केले आहे. युक्रेनला समर्थन देण्यासाठी या तिघा नेत्यांनी धोका पत्कारून पोलंड ते युक्रेनची राजधानी कीवपर्यंत आगगाडीने प्रवास केला. १५ मार्चच्या सायंकाळी या नेत्यांशी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांची बैठक झाली. रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्यास चालू केल्यापासून प्रथमच पाश्चात्त्य देशांच्या प्रमुखांनी युक्रेनला भेट दिली आहे.
१. झेक रिपब्लिकचे पंतप्रधान पॅत्र फियाला यांनी ‘युक्रेन एकटे नसून आम्ही सर्व देश त्याच्या बाजूने उभे आहोत’, असे म्हटले आहे.
२. पोलंडचे पंतप्रधान मातेयूश मोरावियास्की यांनी सांगितले की, युक्रेनचा पराभव झाल्यास युरोप आजसारखे पुन्हा कधी रहाणार नाही. युरोपची स्थिती ही ‘पराभव झालेला’, ‘अपमानित’ आणि ‘दुर्दशा झालेला’ खंड अशी होईल.
३. स्लोवेनियाचे पंतप्रधान डेनिस शिमहॅल यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, या बैठकीत रशियावर निर्बंध लावण्यासह त्याला आतंकवादाचा ‘प्रायोजक देश’ घोषित करण्याच्या प्रक्रियेला वाचा फोडण्यात आली.
४. बैठकीच्या ठिकाणी कीव शहरात होत असलेल्या बाँब वर्षावाचा आवाज येत होता.
५. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी म्हटले की, युक्रेनवासियांना कळून चुकले आहे की, आपले राष्ट्र आता ‘नाटो’चा भाग बनू शकत नाही. आम्ही अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहोत की, ‘नाटो’चे द्वार आमच्यासाठी उघडे आहे; परंतु आम्ही हेसुद्धा ऐकले आहे की, आम्ही त्याचा भाग होऊ शकत नाही. मला आनंद आहे की, आमच्या नागरिकांनी हे सत्य स्वीकारायला आणि स्वावलंबी व्हायला आरंभ केला आहे.