मुंबईतील १४ सहस्र स्वच्छता कामगारांना येत्या २ वर्षांत प्रत्येकी ३९९ चौ.मी. घर देणार ! – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

एकनाथ शिंदे

मुंबई, १७ मार्च (वार्ता.) – मुंबईतील मोडकळीस आलेल्या स्वच्छता कामगारांच्या चाळी आणि इमारती यांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. येत्या ३ वर्षांत १४ सहस्र कामगारांना प्रत्येकी ३९९ चौरस मीटरचे घर देण्यात येईल, असे आश्वासन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. १६ मार्च या दिवशी आमदार प्रसाद लाड यांसह अन्य सदस्यांनी मुंबईतील स्वच्छता कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास करण्याविषयी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी वरील उत्तर दिले.

यावर माहिती देतांना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘मुंबईमध्ये एकूण २९ सहस्र ८१६ स्वच्छता कामगार आहेत. त्यांपैकी ५ सहस्र ५९२ कामगारांना निवासस्थाने देण्यात आली आहेत. नव्याने बांधण्यात आलेल्या सदनिकांचे १० वर्षांचे दायित्व ठेकेदाराचे असणार आहे. वारसा हक्काने स्वच्छता काम करणार्‍या कामगारांना वारसा हक्काने सदनिका प्राप्त होतील. या प्रकरणी लोकप्रतिनिधी राज्यपालांना केलेल्या तक्रारीवरून राज्यपालांनी जानेवारी २०२२ मध्ये या योजनेची चौकशी करण्याचे निर्देश लोकायुक्तांना दिले आहेत. योजनेचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास विकासकांना दंड आकारण्यात येणार आहे.’’