७ वर्षांत कल्याण-डोंबिवली येथील ११ सहस्र ४४२ अनधिकृत बांधकामांवर कारवाई ! – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री
एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होईपर्यंत महानगरपालिका प्रशासनाने कारवाई का केली नाही ? याविषयी संबंधित अधिकार्यांची चौकशी करण्यात यावी ! – संपादक
मुंबई, १७ मार्च (वार्ता.) – वर्ष २०१५ ते २०२१ या कालावधी कल्याण-डोंबिवली नगरपालिका क्षेत्रांतील ११ सहस्र ४४२ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६ मार्च या दिवशी विधान परिषदेत दिली. शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रांतील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. त्यावर शिंदे यांनी वरील माहिती दिली.
या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘अनधिकृत बांधकामांच्या विरोधात केलेल्या कारवाईमध्ये ४५५ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. अनधिकृत बांधकाम निष्कासित करतांना यंत्राद्वारे साहित्य पूर्णपणे पाडून टाकण्यात आले आहे. जेणेकरून पुन्हा कुणी अनधिकृत बांधकाम करण्याचे धारिष्ट्य करणार नाही. महानगरपालिकेच्या आरक्षित जागेच्या ठिकाणी नावाचे फलक लावण्याची सूचना पालिकेच्या अधिकार्यांना देण्यात आली आहे.’’