लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे होळी साजरी करण्यासाठी मशिदींनी नमाजाची वेळ पालटली !

  • हिंदूंच्या सणांच्या दिवशी मशिदींमधून दगडफेक होण्याच्या किंवा हिंदूंवर आक्रमण होण्याच्या बातम्या हिंदूंनी वाचल्या आहेत; मात्र उत्तरप्रदेशात प्रखर हिंदुत्वनिष्ठ योगी आदित्यनाथ यांचे सरकार असल्यामुळे आता अशाही बातम्या वाचायला मिळत आहेत ! – संपादक
  • याला कुणी अल्पसंख्यांकांची ‘सौहार्द वृत्ती’ किंवा ‘सहिष्णुता’ अशी उपमा देऊ नये. उत्तरप्रदेशमध्ये प्रखर हिंदुत्वनिष्ठ योगी आदित्यनाथ हे हिंदूंच्या भरघोस मतांनी निवडून आल्यामुळे काहींचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे होळीच्या दिवशी काही अनुचित झाल्यास ते खपवून घेतले जाणार नसल्याचे या समाजाला पुरते ठाऊक असल्यामुळे त्यांनी नाईलाजाने असा निर्णय घेतला, असे म्हणण्यास वाव आहे ! – संपादक

लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेशातील किमान २२ मशिदींनी होळीच्या सणामुळे त्यांच्या शुक्रवारच्या नमाजाची वेळ पालटण्याचा निर्णय घेतला आहे. लक्ष्मणपुरीतील बहुतेक मशिदींमध्ये शुक्रवारचा नमाज आणि ‘खुत्बा’ (प्रवचन) हे सहसा दुपारी १२.३० वाजता केले जाते. या वर्षी देशभरात होळी आणि शब-ए-बारात हे सण एकाच दिवशी साजरे केले जाणार असल्याने शहरातील या मशिदींनी वेळ पालटून शुक्रवारची नमाज दुपारी १.३० वाजेनंतर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ‘इस्लामिक सेंटर ऑफ इंडिया’ने (आयसीइने) दिली आहे. होळीच्या दिवशी मुसलमानांचा ‘शब-ए-बारात’ हा सण असल्यामुळे या दिवशी मुसलमान मोठ्या प्रमाणात मशिदीत जाऊन नमाजपठण करतात. ‘या दिवशी केलेल्या पापांविषयी मनापासून क्षमा मागितल्यास अल्ला सर्वांना क्षमा करतो’, अशी मुसलमानांची श्रद्धा आहे.

१. नमाजाची वेळ पालटणार्‍यांमध्ये ऐशबाग इदगाह येथील जामा मशीद, अकबरी गेटवरील एक मिनारा मशीद, शाहमीना शाह मशीद यांचा समावेश आहे.

२. आयसीआयचे नेते आणि ऐशबाग ईदगाहचे इमाम मौलाना रशीद यांनी, ‘होळीच्या दिवशी अनुचित घटना टाळण्यासाठी मशिदींनी त्यांच्या नमाजच्या वेळा पालटाव्यात’, अशी सूचना केली होती.

३. शब-ए-बारातही होळीच्याच दिवशी आल्याने मौलवींनी मुसलमानांना कार्यक्रम संपल्यानंतरच मशिदी आणि त्यांच्या प्रियजनांच्या कबरी यांना भेट देण्याचा सल्ला दिला आहे. मुसलमानांना घरापासून दूर असलेल्या मशिदीत जाण्याऐवजी त्यांच्या स्थानिक मशिदींमध्ये प्रार्थना करण्याचा सल्ला दिला.