एका लहान मुसलमान मुलीने निर्मात्या पल्लवी जोशी यांना सांगितले होते ‘तुम्ही मुसलमान नसला, तरी नमाजपठण केले पाहिजे !’

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी घडलेला प्रसंग !

काश्मीरमधील मुसलमानांवर लहान वयातच कशा प्रकारचे संस्कार केले जातात, ते यावरून दिसून येते ! याविषयी तथाकथित निधर्मीवादी तोंड का उघडत नाहीत ? – संपादक

चित्रपटाच्या निर्मात्या पल्लवी जोशी

नवी देहली – वर्ष २०१८ मध्ये आम्ही ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने काश्मीरमध्ये गेलो होतो. तेथील ‘शिकारा’मध्ये (दल सरोवरातील नौकेचा एक प्रकार) चित्रीकरण चालू होते. तेव्हा तेथे काही मुले होती. त्यातील एका लहान मुलीशी मी गप्पा मारू लागले. मी मुंबईची आहे, हे तिला सांगितल्यावर तिने मला ‘तुम्ही मुंबईत नमाजपठण कुठे करता ?’ असा प्रश्‍न विचारला. तेव्हा मी तिला ‘मी नमाजपठण करत नाही’, असे सांगितले. त्यावर तिने ‘का ?’ असा प्रश्‍न मला विचारला. मी तिला सांगितले की, मी मुसलमान नाही. त्यावर तिने ‘मग काय झाले, तुम्हाला नमाजपठण केले पाहिजे ना ?’, असे ती म्हणाली. या घटनेची माहिती या चित्रपटाच्या निर्मात्या आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी येथे एका पत्रकार परिषदेत देऊन मुसलमान लहान मुलांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकला.

पल्लवी जोशी म्हणाल्या की, या ४-५ वर्षांच्या मुलीला हे ठाऊक नाही की, या देशात अन्य धर्माचे लोक रहातात आणि त्यांची प्रार्थना करण्याची पद्धत वेगळी आहे. भारत विविधतेने नटलेला देश आहे; मात्र ही विविधताच आज काश्मीरमधून नष्ट करण्यात आली आहे. ही मुलगी जेव्हा मोठी होईल आणि मतदान करील, तेव्हा ती कोणत्या आधारावर सरकार निवडेल ?, असाही प्रश्‍न जोशी यांनी या वेळी उपस्थित केला.