तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ कायद्याची कार्यवाही न केल्यास शाळांवर कारवाई करणार ! – डॉ. विश्वजित कदम, राज्यमंत्री
मुंबई, १६ मार्च (वार्ता.) – केंद्रशासनाच्या तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ कायदा (कोटपा) २००३ ची राज्यभर कार्यवाही करण्यात येत आहे. या कायद्यानुसार शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्डच्या परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, उत्पादन, वितरण आणि साठवण करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यासाठी केंद्रशासनाच्या तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था धोरणांतर्गत सर्व शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात पिवळी रेषा रेखांकित केली जात आहे. ज्या शाळा या पिवळी रेषा रेखांकित नियमांचे पालन करणार नाहीत, अशा शाळांवर कारवाई करण्यात येईल, असे सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभेत १५ मार्च या दिवशी भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि योगेश सागर यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना ते बोलत होते. डॉ. विश्वजित कदम पुढे म्हणाले की, इंडियन इन्सिस्ट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्स यांनी केलेल्या जागतिक युवा तंबाखू सर्वेक्षण २०१९ च्या चौथ्या फेरीत देशात १३ ते १५ वयोगटांतील बालकांचे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण ५.१ टक्के असल्याचे आढळून आले आहे, तर गेल्या १० वर्षांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण ४२ टक्क्यांनी अल्प झाल्याचे आढळून आले आहे.