‘डोळ्यांवर उपाय केल्यावर खरे त्रास कसे प्रकट होतात आणि डोळ्यांवर उपाय करण्याचे महत्त्व’, या संदर्भात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

‘१५.११.२०२१ या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मला विदेशात असणारे ‘एक संत’ यांच्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करायला सांगितले. त्या संतांच्या मनात नकारात्मक विचार येऊन त्यांनी इतरांशी संपर्क तोडला होता. याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितल्यावर त्यांनी हे त्रास वाईट शक्तींच्या त्रासामुळे होत असून त्या संतांसाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

१. त्रास होत असणार्‍या संतांवर डोक्यापासून पोटापर्यंत त्रासदायक (काळ्या) शक्तीचे आवरण असल्याचे जाणवणे आणि प्रथम ते दूर करणे

दोन्ही हातांची मधली बोटे एकमेकांना जोडून आणि मनगटे डोक्याला दोन बाजूंनी टेकवून मनोर्‍याप्रमाणे केलेली मुद्रा दाखवतांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

मी त्या संतांसाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करायला आरंभ केला. यासाठी मी प्रथम त्यांचे स्मरण केले. (‘एखाद्या दूरच्या व्यक्तीसाठी उपाय करतांना तिचे स्मरण केल्यास त्या व्यक्तीची स्पंदने आपल्याला आपल्या शरिरावर जाणवतात आणि तेव्हा आपण आपल्यावर उपाय केल्यावर त्या व्यक्तीसाठी उपाय होऊन तिचे त्रास दूर होतात.’ – संकलक) मी त्या संतांसाठी उपाय शोधले असता मला जाणवले, ‘त्यांच्यावर डोक्यापासून पोटापर्यंत त्रासदायक शक्तीचे आवरण आहे.’ मी जप शोधला असता मला ‘निर्गुण’ हा जप मिळाला. आवरण काढण्यासाठी मी दोन्ही हातांची मधली बोटे एकमेकांना जोडून आणि मनगटे डोक्याला दोन बाजूंनी टेकवून ‘मनोर्‍याप्रमाणे (टॉवरप्रमाणे) मुद्रा’ केली (छायाचित्र क्र. १) आणि ती मुद्रा माझ्या कुंडलिनीचक्रांवरून ‘वरून खाली आणि खालून वर’ अशी ७ – ८ वेळा फिरवली. तेव्हा मी ‘निर्गुण’ हा जप केला. त्या संतांवरचे आवरण दूर करण्यासाठी मला १० मिनिटे लागली.

२. पाऊण घंटा उपाय केल्यावर संतांच्या सर्व चक्रांवरील त्रासदायक शक्ती दूर झाल्याचे जाणवणे

त्या संतांवरील आवरण काढल्यावर त्यांच्यावर पुढे उपाय करण्यासाठी मी एका हाताचा तळवा माझ्या आज्ञाचक्रावर आणि दुसर्‍या हाताचा तळवा मणिपूरचक्रावर ठेवला अन् पाऊण घंटा ‘निर्गुण’ हा नामजप करत त्यांच्यासाठी उपाय केले. हे उपाय केल्यावर त्या संतांच्या त्या दोन्ही चक्रांवरील त्रासदायक शक्ती पूर्णपणे दूर झाल्याचे मला जाणवले. तसेच तेव्हा त्यांच्या अन्य कोणत्याही चक्रांवर मला त्रास जाणवत नव्हता.

३. संतांच्या डोळ्यांतील त्रासदायक शक्ती दूर करू लागल्यावर आधी न जाणवलेला त्यांच्या अनाहतचक्रावरील त्रास उघडकीस येणे आणि वाईट शक्तींनी त्या संतांच्या अनाहतचक्रावरील त्रास अप्रकट ठेवून फसवले असल्याचे लक्षात येणे

मी शेवटचा उपाय म्हणून डोळ्यांवर उपाय करणे आरंभ केले. (‘सर्व चक्रांवरील त्रासदायक शक्ती दूर झाली, तरी डोळ्यांवर थोडीफार त्रासदायक शक्ती शिल्लक रहातेच. ती दूर केल्यावरच उपाय पूर्ण होतात.’ – संकलक) डोळ्यांवर उपाय करण्यासाठी मला ‘महाशून्य’ हा नामजप मिळाला. मी माझ्या एका हाताचा तळवा दोन्ही डोळ्यांवर आणि दुसर्‍या हाताचा तळवा डोक्याच्या मागे ठेवून १० मिनिटे नामजपादी उपाय केले. हे उपाय केल्यावर मला त्या संतांचा त्रास अल्प होण्याऐवजी वाढल्याचे जाणवले; म्हणून मी चक्रांवर हाताची बोटे फिरवून ‘कोणत्या चक्रावर त्रास जाणवतो ?’, हे पाहिले. त्या वेळी मला त्या संतांच्या अनाहतचक्रावर त्रासदायक शक्तीचा दाब पुष्कळ प्रमाणात असल्याचे लक्षात आले. त्या संतांच्या डोळ्यांतील त्रासदायक शक्ती दूर करू लागल्यावर आधी न जाणवलेला त्यांच्या अनाहतचक्रावरील त्रास उघडकीस आला. हे मी प्रथमच अनुभवत होतो. यावरून ‘वाईट शक्ती कशा फसवतात ?’, हे लक्षात आले. वाईट शक्तींनी त्या संतांच्या अनाहतचक्रावरील त्रास अप्रकट ठेवून मला फसविले होते; पण डोळ्यांवर उपाय केल्याने त्यांची फसवेगिरी उघडकीस आली.

४. संतांच्या अनाहतचक्रामध्ये वाईट शक्तींनी साठवलेली त्रासदायक शक्ती दूर करण्यासाठी दीड घंटा उपाय करावे लागणे आणि या त्रासदायक शक्तीमुळेच त्या संतांच्या मनात नकारात्मक विचार आले असणे

त्या संतांवर उपाय होण्यासाठी मी एका हाताचा तळवा माझ्या आज्ञाचक्रावर आणि दुसर्‍या हाताचा तळवा माझ्या अनाहतचक्रावर ठेवून ‘निर्गुण’ हा नामजप करू लागलो. त्या संतांच्या अनाहतचक्रामध्ये वाईट शक्तींनी एवढी त्रासदायक शक्ती साठवली होती की, ती दूर करण्यासाठी मला दीड घंटा उपाय करावे लागले. अनाहतचक्रातील या त्रासदायक शक्तीमुळेच त्या संतांच्या मनात नकारात्मक विचार आले होते. उपायांमुळे आरंभी ‘निर्गुण’ हा आवश्यक असलेला नामजप पालटून तो ‘महाशून्य’ आणि त्यानंतर ‘शून्य’ झाला. (‘शून्य’, ‘महाशून्य’, ‘निर्गुण’ आणि ‘ॐ’ हे क्रमाने उच्च, उच्च स्तराचे नामजप आहेत. त्रासाचे स्वरूप सर्वाेच्च असेल, तर ‘ॐ’ हा नामजप करणे आवश्यक असते. तो नामजप करत उपाय केल्यावर त्रासाचे स्वरूप अल्प, अल्प होत जाते आणि आवश्यक असलेला नामजपही अल्प, अल्प स्तराचा, म्हणजे ‘निर्गुण’, ‘महाशून्य’ आणि त्यानंतर ‘शून्य’ असा होत जातो. त्रास आणखी न्यून करण्यासाठी पुढे पंचमहाभूतांचे नामजप करावे लागतात.’ – संकलक)

५. वाईट शक्ती संतांच्या डोक्यावर त्रासदायक शक्तीचा प्रवाह सोडत असल्याचे लक्षात येणे आणि तेव्हा डावा तळहात भूमीच्या दिशेने ठेवून त्यावर उजवा तळहात उपडा, म्हणजे आकाशाच्या दिशेने ठेवून उपाय केल्यावर वरून येणारा त्रासदायक शक्तीचा प्रवाह थांबवता येणे

डावा तळहात भूमीच्या दिशेने ठेवून त्यावर उजवा तळहात उपडा, म्हणजे आकाशाच्या दिशेने केलेली मुद्रा दाखवतांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

त्या संतांसाठी उपाय करत असतांना ‘वाईट शक्ती त्या संतांना आणखी कशा प्रकारे त्रास देत आहेत ?’, हेही माझ्या लक्षात आले. ते संत रहात असलेल्या खोलीत मला पुष्कळ प्रमाणात त्रासदायक शक्तीचा दाब जाणवत होता. आधी तो मला जाणवला नव्हता. वाईट शक्ती त्या संतांच्या डोक्यावर त्रासदायक शक्तीचा प्रवाह सोडत होत्या. त्यामुळे मी काही घंटे उपाय करूनही त्या संतांचा त्रास लवकर अल्प होत नव्हता. वरून येणारा त्रासदायक शक्तीचा प्रवाह थोपवण्यासाठी मी माझा डावा तळहात भूमीच्या दिशेने ठेवून त्यावर माझा उजवा तळहात उपडा, म्हणजे आकाशाच्या दिशेने येईल असा ठेवला. (छायाचित्र क्र. २) त्यामुळे उपाय होऊन माझ्या आकाशाच्या दिशेने असलेल्या तळहातामुळे वरून संतांच्या खोलीत येणारा त्रासदायक शक्तीचा प्रवाह थांबला आणि त्याच वेळी भूमीच्या दिशेने केलेल्या तळहातामुळे खोलीवर उपाय होऊन तेथील त्रासदायक शक्ती नष्ट झाली. तेव्हा मी ‘निर्गुण’ हा नामजप केला. हा उपाय मला १० मिनिटे करावा लागला. त्यानंतर खोलीत पूर्वी जाणवत असलेला दाब नाहीसा झाला.

६. संत रहात असलेल्या खोलीतील दाब नाहीसा झाल्यावर त्या संतांच्या अनाहतचक्रावर उपाय करणे, तसेच शेवटी त्यांच्या डोळ्यांवरही उपाय करणे आणि त्यानंतर त्या संतांना होत असलेला त्रास दूर झाल्याचे जाणवणे

संत रहात असलेल्या खोलीतील दाब नाहीसा झाल्यावर मी त्या संतांच्या अनाहतचक्रावर उपाय होण्यासाठी पुन्हा उपाय शोधले. मला ‘अंगठ्याच्या मुळाशी तर्जनीचे टोक लावणे’, ही आकाशतत्त्वाची मुद्रा आणि ‘आकाशदेवाचा नामजप’, हे उपाय मिळाले. मी दोन्ही हातांनी ती मुद्रा करून एका हाताच्या मुद्रेने आज्ञाचक्रावर आणि दुसर्‍या हाताच्या मुद्रेने अनाहतचक्रावर न्यास केला अन् आकाशदेवाचा नामजप करत उपाय केले. हे उपाय ३० मिनिटे केल्यावर त्या संतांच्या अनाहतचक्रावरील त्रास पूर्णपणे दूर झाला. त्यानंतर मी त्या संतांच्या डोळ्यांवर उपाय होण्यासाठी माझ्या डोळ्यांवर उपाय केले आणि तेथील त्रासदायक शक्तीही दूर केली. त्यानंतर त्या संतांना होत असलेला त्रास पूर्णपणे दूर झाल्याचे मला जाणवले.

७. त्या संतांसाठी उपाय पूर्ण झाल्यावर त्याचा परिणाम घंटाभरातच पहायला मिळणे, म्हणजे त्यांनी इतरांना आपणहून संपर्क करणे

गेले २ दिवस कुणाशी संपर्कात नसलेल्या त्या संतांनी उपाय पूर्ण झाल्यावर घंटाभरातच इतरांना आपणहून संपर्क केला. यावरून त्यांची मनःस्थिती आता चांगली असल्याचे लक्षात आले.

कृतज्ञता : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेनेच मी त्या संतांसाठी उपाय करू शकलो आणि मला उपायांच्या संदर्भात नाविन्यपूर्ण गोष्टी शिकायला मिळाल्या. याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (९.२.२०२२)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक