राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना जामीन संमत !
सातारा, १६ मार्च (वार्ता.) – खटाव तालुक्यातील पडळ येथील साखर कारखान्यावर ११ मार्च २०२१ या दिवशी हाणामारी झाली होती. या हाणामारीत एक कामगार गंभीर घायाळ झाला होता. उपचाराच्या वेळी त्या कामगाराचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना अटक करण्यात आली होती. घार्गे यांनी सर्वाेच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. सर्वाेच्च न्यायालयाने घार्गे यांना जामीन संमत केला आहे. (राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना हत्येच्या प्रकरणी अटक होत असेल, तर कुणी राष्ट्रवादी काँग्रेसवर बंदी घालण्याची मागणी केल्यास त्यात दोष कुणाचा ? – संपादक)
कामगाराच्या मृत्यूच्या प्रकरणी वडूज पोलिसांनी ८ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंद केला होता. ७ जणांना यापूर्वी पोलिसांनी अटक केली होती. घार्गे यांनी प्रकृतीचे कारण देत जिल्हा आणि सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता; मात्र घार्गे यांना जामीन अर्ज फेटाळत न्यायालयाने त्यांना कोठडी ठोठावली होती.
नुकतीच झालेली जिल्हा बँक निवडणूक घार्गे यांनी न्यायालयाच्या अनुमतीने कारागृहातूनच लढवली होती. त्यामध्ये ते सोसायटी मतदारसंघातून विजयीही झाले होते. (कारागृहात राहून निवडणूक लढवून ती जिंकणे, असे केवळ भारतातच घडू शकते. हे लोकशाहीसाठी हानीकारक आहे. – संपादक)