फडणवीस मुख्यमंत्री झाले, तर शेतकर्यांची वीज तोडणार नाही ! – चंद्रशेखर बावनकुळे, माजी ऊर्जामंत्री
विधान परिषद
मुंबई, १६ मार्च (वार्ता.) – युतीच्या ५ वर्षांच्या काळात शेतकर्यांकडे २८ सहस्र कोटी रुपयांची वीजदेयकाची थकबाकी होती; तरीही ऊर्जा विभागाला ४ सहस्र १५ कोटी रुपयांचा नफा होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तर ‘५ वर्षे शेतकर्यांची वीज तोडणार नाही’, अशी ग्वाही माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली. १६ मार्च या दिवशी अर्थसंकल्पावरील चर्चेवर बोलतांना बावनकुळे यांनी वरील वक्तव्य केले.
या वेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘‘राज्यावर एकूण ७ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीवर ५५ सहस्र रुपयांचे कर्ज आहे. महाविकास आघाडीच्या काळात १ लाख ९८ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज वाढले. राज्याची कर्ज घेण्याची क्षमता आहे. शेतकर्यांचे वीजदेयक माफ करण्यासाठी कर्ज घ्यावे लागल्यास सरकारने कर्ज घ्यावे; मात्र शेतकर्यांची वीजजोडणी तोडू नये.’’
पुढील अधिवेशन नागपूर झाले नाही, तर न्यायालयात धाव घेऊ !
वर्ष १९५३ मध्ये झालेल्या नागपूर करारामध्ये वर्षातील एक विधीमंडळाचे अधिवेशन नागपूर येथे घेण्याचा ठराव झाला आहे. या कराराचा भंग झाला आहे. पुढील अधिवेशन नागपूर येथे झाले नाही, तर न्यायालयात धाव घेऊ, अशी चेतावणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.