भाजपचे नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची चौकशी होणार !
मुंबई, १६ मार्च (वार्ता.) – युती सरकार असतांना माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात चंद्रशेखर बावनकुळे ५ वर्षे ऊर्जामंत्री होते. त्यांच्या काळात झालेल्या सर्वच कामांची चौकशी होणार असून या कामांची चौकशी करण्यासाठी ‘त्रिसदस्यीय समिती’ स्थापन करण्यात आली आहे. १ मासात ही समिती अहवाल सादर करेल.
फडणवीस सरकारच्या कार्यकाळात महावितरणमध्ये अनेक पायाभूत कामे झाली; मात्र याच कालावधीत महावितरणची थकबाकीही पुष्कळ प्रमाणात वाढली होती. बावनकुळे यांच्या काळात महावितरणने हाती घेतलेल्या कामांची खरंच आवश्यकता होती का ? त्या कामांचा लोकांना लाभ झाला का ?, हे शोधण्याचे काम चौकशी समिती करेल. गेल्या काही मासांत ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात अनेकदा आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. बावनकुळे आणि राऊत हे दोन्ही नेते विदर्भातील आहेत.