सैन्य भरतीमध्ये युवकांना वयोमर्यादेत सवलत द्या ! – खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
सातारा, १६ मार्च (वार्ता.) – सैन्यदलामध्ये जाण्यासाठी अनेक युवकांनी भरतीपूर्व सिद्धता केली आहे; मात्र कोरोना महामारीमुळे २ वर्षांपासून सैन्य भरतीप्रक्रिया बंद आहे. कोरोनाचे सावट अल्प होत असून केंद्र सरकारने सैन्य भरती मेळावे घेऊन देशसेवा करण्यासाठी इच्छुक असलेल्या युवकांना संधी द्यावी. भरतीअभावी संधी गमावलेल्या युवकांना विशेष गोष्ट म्हणून वयोमर्यादेत सवलत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केली.
खासदार पाटील यांनी नियम ३७७ अन्वये तातडीचे आणि लोकहितासाठी महत्त्वाची सूत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवली.
खासदार पाटील म्हणाले की, सातारा जिल्ह्याला पुष्कळ मोठी सैनिकी परंपरा आहे. विशेष म्हणजे ती अद्याप चालू आहे. जिल्ह्यातील बहुतांश युवक देशसेवेसाठी सैन्यात जाण्यासाठी प्राधान्य देतात. त्यासाठी ते २-२ वर्षे शारीरिक आणि अन्य परीक्षा यांची सिद्धता करत असतात. सैन्यात जाण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी ते अपार कष्ट घेतात; मात्र कोरोनामुळे सैन्य भरतीप्रक्रिया सतत स्थगित होत आहे. परिणामी युवकांची संधी हुकत असून त्यांचा स्वप्नभंग होत आहे. माझ्या मतदारसंघात अशी गावे आहेत, की जिथे गावातील घरटी एक व्यक्ती सैन्यात आहे. ही परंपरा लोप पावू नये.