सातार्यात अज्ञातांनी केलेल्या आक्रमणामध्ये अधिवक्त्याचा डोळा कायमस्वरूपी निकामी !
कायदा-सुव्यवस्थेची दु:स्थिती !
सातारा, १६ मार्च (वार्ता.) – येथील शाहूनगर परिसरात रहात असलेले न्यायाधिशांचे बंधू अधिवक्ता राममोहन खारकर यांच्यावर अज्ञातांनी प्राणघातक आक्रमण केले. या आक्रमणात त्यांचा एक डोळा कायमस्वरूपी निकामी झाला असल्याची घटना घडली आहे. या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत ‘सातारा जिल्हा बार असोसिएशन’च्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात एक दिवस ‘काम बंद’ आंदोलन करण्यात आले.
अधिवक्ता खारकर यांच्यावर १२ मार्च या दिवशी अज्ञात युवकांच्या टोळीने आक्रमण केले. यामध्ये ते गंभीर घायाळ झाले. त्यांना तातडीने पुणे येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले; मात्र या आक्रमणात त्यांचा एक डोळा कायमस्वरूपी निकामी झाला असल्याचे खारकर यांच्यावर उपचार करणार्या आधुनिक वैद्यांनी स्पष्ट केले. (अज्ञात युवकांच्या आक्रमणात अधिवक्त्याचा डोळा निकामी होण्यापर्यंत त्यांना मारहाण होते ही घटना पोलिसांचा धाक संपल्याचे लक्षण आहे. – संपादक) या पार्श्वभूमीवर ‘सातारा जिल्हा बार असोसिएशन’ आणि जिल्ह्यातील सर्व तालुका बार असोसिएशन यांच्या वतीने न्यायालय परिसरात निषेध सभा घेण्यात आल्या, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. अधिवक्ता खारकर यांच्या आक्रमणकर्त्यांना तातडीने अटक करावी, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.