हिजाबबंदीचा निकाल, हा राज्यघटनेचा विजय ! – श्री. प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक उच्च न्यायालयाकडून हिजाबबंदी कायम ठेवण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचे ‘श्रीराम सेना’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी स्वागत केले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलतांना ते म्हणाले, ‘‘हिजाबबंदीचा निकाल, राज्यघटनेचा विजय आहे. हिजाब हा गणवेशाचा भाग असू शकत नाही. शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब इत्यादी नसावे, अशी भावना सामान्य माणसामध्ये होती. हे इस्लामीवाद्यांच्या डोक्यात कसे शिरले नाही, हे कळत नाही. अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण करण्याला ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ आणि ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’ या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या आतंकवादाचा आरोप असलेल्या संघटनेशी संबंधित संघटनाच कारणीभूत आहेत.’’

श्री. मुतालिक पुढे म्हणाले की, हा निकाल मुसलमानांनी पाळावा. गेल्या मासातील शाळा-महाविद्यालयांतील हिजाबबंदीच्या अंतरिम आदेशाचे विद्यार्थी, पालक आणि मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) यांनी पालन केले नव्हते. आता मात्र त्यांनी उच्च न्यायालयाच्या या अंतिम निर्णयाचे पालन करून विद्यार्थ्यांना विद्यार्जनसाठी संधी दिली पाहिजे. या निर्णयाला जे कुणी पुढच्या न्यायालयात आव्हान देणार असतील, तर ते देऊ देत; पण विद्यार्थ्यांना विद्या ग्रहण करण्यात अडथळे निर्माण करू नका, असे मी स्पष्टपणे सांगतो.