(म्हणे) ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट समाजात फूट पाडणारा !’
|
|
नवी देहली – काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर प्रकाश टाकणारा आणि प्रत्येक मनुष्याचे हृदय हेलावून टाकेल, अशा प्रकारे वास्तव इतिहासाचे चित्रण करणार्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या विरोधात हिंदुद्वेषी ‘बीबीसी’ वृत्तवाहिनीने तिच्या संकेतस्थळावर एक लेख प्रकाशित केला आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट समाजात फूट पाडणारा !’, या मथळ्याखाली प्रकाशित लेखातून लेखिका मेरिल सेबास्टियन यांनी हिंदूंवरील अत्याचारांची तीव्रता न्यून होईल, अशा प्रकारे धर्मनिरपेक्षतेचा उदोउदो करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच काश्मिरी मुसलमानांचे नकारात्मक चित्रण केल्याचा गवगवाही या लेखाद्वारे करण्यात आला आहे.
Kashmir Files: Vivek Agnihotri’s film exposes India’s new fault lines https://t.co/1E8niTkkZQ
— BBC News (World) (@BBCWorld) March 15, 2022
१. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला लक्षावधी भारतियांकडून मिळणार्या अभूतपूर्व प्रतिसादाविषयी लेखात कोणताच उल्लेख नसून ‘हा चित्रपट म्हणजे केवळ भाजप आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या उजव्या विचारसरणीला अनुरूप असल्याने त्यास मोठे समर्थन प्राप्त होत आहे’, असे धादांत एकांगी लेखन करण्यात आले आहे.
२. यामध्ये भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे अनेक मंत्री आणि नेते यांनी चित्रपटाला दिलेल्या समर्थनास चतुराईने चुकीचे असल्याचे दाखवण्यात आले आहे. मोदी यांच्या ‘चित्रपटाच्या विरोधात होत असलेली टीका हे षड्यंत्र आहे’, या वक्तव्यावर टीका करण्यात आली आहे.
३. ‘निरपराध्यांच्या रक्तामध्ये लपलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती यापुढे होऊ नये’, यासाठी सर्वांनी हा चित्रपट पहावा’, असे आवाहन करणार्या महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांचाही लेखाद्वारे निषेध करण्यात आला आहे.
४. दुसरीकडे ‘शिकारा’ या काश्मिरी हिंदूंच्या अत्याचारांवर कथित रूपाने प्रकाश टाकणार्या चित्रपटाचा उदोउदो करण्यात आला आहे. लेखिकेने त्यासाठी या चित्रपटाचे सहलेखक आणि काश्मिरी हिंदु असलेले राहुल पंडिता यांच्या मवाळ भूमिकेला उचलून धरले आहे आणि ‘द कश्मीर फाइल्स’ला अधिक धर्मांध अन् फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
५. ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या आधीच्या ‘द ताश्कंत फाइल्स’ या चित्रपटालाही कशा प्रकारे विरोध करण्यात आला होता, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न लेखिका मेरिल सेबास्टियन यांनी केला आहे.