सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी घेतलेल्या शिबिरानंतर पंढरपूर येथील साधिकांना आलेल्या अनुभूती
उद्या होळी पौर्णिमा (१७ मार्च २०२२) या दिवशी सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…
१. दत्ताच्या नामजपाला आरंभ केल्यावर कुलदेवतेचे दर्शन होणे आणि होणारा त्रास अल्प होणे
‘२१.५.२०२० या दिवशी सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी पंढरपूरमध्ये साधनेविषयी शिबिर घेतले. त्या शिबिराला माझी आतेबहीण श्रीमती सुवर्णा बंडमेली गेली होती. तिच्या यजमानांचे वयाच्या ३४ व्या वर्षी अपघाती निधन झाले; म्हणून ती दुःखी होती. त्या वेळी मी तिला दत्ताचा नामजप करायला सांगितला होता आणि सद्गुरु ताईंच्या मुखातूनही तिला नामजप मिळाला होता. तिने श्रद्धा ठेवून नामजप करायला आरंभ केला. २ दिवसांनी तिला विचित्र स्वप्न पडले. स्वप्नात तिला विचित्र आकृत्या आणि भूते दिसू लागली. तिने घाबरून मुलाला उठवले आणि दुसर्या दिवशी मला भ्रमणभाष करून तिने झालेला त्रास सांगितला. नामजपाला आरंभ केल्यावर त्रास होण्यामागील कारणे मी तिला समजावून सांगितल्यावर तिने पुन्हा नामजपाला आरंभ केला. तेव्हा तिचे यजमान स्वप्नात आले आणि हसून निघून गेले. नंतर तिला कुलदेवतेचे दर्शन झाले आणि होणारा त्रास हळूहळू अल्प झाला. तिला सद्गुरु ताईंच्या आवाजातील चैतन्य लक्षात आले; म्हणून तिने सद्गुरु ताई आणि प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त केली.
२. सद्गुरु स्वातीताईंच्या मुखातून नामजप मिळाल्यामुळे ‘मोठे येणारे संकट टळले’, असे श्रीमती नांदगिरे यांना वाटणे
सद्गुरु स्वातीताईंच्या शिबिरात श्रीमती नांदगिरे यांनी दत्तगुरु आणि कुलदेवता यांच्या नामजपाचे महत्त्व ऐकले अन् त्यांनी नामजप चालू केला. त्यांचा नामजप एकाग्रतेने होत होता. ४ – ५ दिवसांनी त्यांना अचानक घाम आला आणि चक्कर आली; म्हणून त्या घाबरल्या. त्यांना लगेच आधुनिक वैद्यांकडे नेले. आधुनिक वैद्यांनी त्यांना ३ दिवस अतीदक्षता विभागामध्ये (‘आय्.सी.यू.’मध्ये) ठेवण्यास सांगितले. त्या वेळी त्यांच्या लक्षात आले की, मला काहीतरी मोठा आजार होणार होता; परंतु देवालाच काळजी ! देवाने मला सद्गुरूंच्या मुखातून नामजप दिला आणि ‘येणारे मोठे संकट टळले’, असे त्यांना वाटले. ‘देवा, माझ्यावर तू कृपा केलीस, यासाठी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे. त्यानंतर त्यांनी ‘मी नामस्मरण चालू ठेवणार आहे’, असे सांगितले.’
– सौ. सुनीता या. बट्टेवार, पंढरपूर (११.६.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |