सनातनच्या पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळआजी आणि सुश्री (कु.) कला खेडेकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के ) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
सनातनच्या ११७ व्या संत पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळआजी (वय ८२ वर्षे) आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) कला खेडेकर (वय ५३ वर्षे) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये अन् पू. सिंगबाळआजींच्या संत सन्मान सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती
सनातनच्या ११७ व्या संत पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ (वय ८२ वर्षे) यांच्या संत सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या फोंडा (गोवा) येथील घरी जाण्याची संधी मिळाली. त्या आधीही मी सेवेनिमित्त त्यांच्या घरी गेले होते. तेव्हा पू. सिंगबाळआजी आणि सुश्री (कु.) कला खेडेकर यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे अन् संत सन्मान सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. सहजता आणि प्रेमभाव असलेल्या पू. सिंगबाळआजी अन् सुश्री (कु.) कलाताई !
१ अ. साधिकेला कुटुंबातील सदस्याप्रमाणेच वागणूक देणे : काही मासांपूर्वी मला पू. आजींच्या सेवेनिमित्त त्यांच्या घरी जाण्याची संधी लाभली. मी पू. आजी आणि कलाताई यांना या पूर्वी पाहिले नव्हते, तरीही त्या दोघींनी मला वेगळेपण जाणवू दिले नाही. त्यांनी मला त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच वागणूक दिली. माझी त्यांच्याशी जवळीक झाली.
१ आ. पू. आजी आणि कलाताई या दोघींच्या वागण्या-बोलण्यात अहं न जाणवता सहजता जाणवत असे. त्या दोघीही नेहमी आनंदी असतात.
१ इ. आधार वाटणे : खरेतर मी पू. आजींच्या घरी त्यांना साहाय्य करण्यासाठी जायचे; परंतु मलाच त्या दोघींचा आधार वाटायचा. मला त्यांच्याकडे जाण्याची ओढ असायची. मी त्यांच्या घरी गेल्यावर मला स्वतःच्याच घरी आल्यासारखे वाटायचे. माझ्यात ‘मनमोकळेपणाचा अभाव’ हा अहंचा पैलू आहे; परंतु त्या दोघींच्या मनमिळाऊ स्वभावामुळे मी त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलू शकत असे.
१ ई. पू. आजींची प्रीती ! : त्या दोघी माझ्या घरच्यांविषयी पुष्कळ आपुलकीने विचारपूस करत. मागील वर्षी दिवाळीपूर्वी माझ्या वडिलांचा अपघात होऊन त्यांच्या हाताला पुष्कळ सूज आली होती. मी दिवाळीच्या वेळी गावी जाणार होते. तेव्हा पू. आजींनी मला त्यांच्याकडील काही औषधी मुळ्या दिल्या आणि त्या उगाळून तो लेप वडिलांच्या हाताला लावायला सांगितला. त्याचा माझ्या वडिलांना चांगला लाभ झाला. त्या वेळी आजींनी माझ्या घरातील सर्वांसाठी खाऊही दिला होता.
१ उ. ‘घरी गेल्यावर कसे वागायचे ?’, याविषयी पू. आजींनी प्रेमाने सांगणे : ‘घरी गेल्यावर घरच्यांशी प्रेमभावाने कसे वागायचे ?’, याविषयी पू. आजींनी सांगितले. पू. आजी हे सर्व सांगतांना मला अत्यंत प्रेमाने जवळ घेत होत्या. त्यांच्या प्रीतीमुळेच मला त्यांच्याविषयी पुष्कळ आपलेपणा वाटत असे. ‘स्वतःच्या कृतींतून इतरांना प्रेम आणि आनंद कसा देता येईल ?’, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले.
२. पू. सिंगबाळआजींच्या संत सन्मान सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती
२ अ. पू. आजींच्या घराजवळ पोचल्यावर घरात प्रवेश करण्यापूर्वी ‘मी मंदिरात प्रवेश करणार आहे’, असे मला जाणवत होते.
२ आ. घराच्या दारातून पुष्कळ प्रकाशाचे प्रक्षेपण होऊन मला थंडावा जाणवत होता.
२ इ. घरात गेल्यावर मला आनंद जाणवून त्यात उत्तरोत्तर वृद्धी होत गेली.
२ ई. देवघरात गेल्यावर ‘आश्रमातील ध्यानमंदिरातच आहोत’, असे वाटणे : घरातील देवघराकडे पाहून मला सात्त्विकता जाणवली आणि माझी भावजागृती झाली. माझे मन एकाग्र होऊन मला शांतीची अनुभूती येत होती. ‘मी आश्रमातील ध्यानमंदिरातच आहे’, असे मला वाटत होते.
३. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘हे परात्पर गुरुदेवा, ‘आपल्याच कृपेमुळे मला संतसेवेची आणि त्यांच्याकडून शिकण्याची संधी लाभली’, याबद्दल आपल्या श्री चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘तुम्हाला अपेक्षित अशी साधना आम्हा सर्वांकडून करवून घेऊन आम्हाला तुमच्या पावन चरणकमली घ्या’, अशी शरणागतभावाने प्रार्थना !’
– श्री गुरुचरणी समर्पित,
वैद्या (कु.) मोनिका अरविंद कल्याणकर (वय २१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.२.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |