दडपलेले सत्य उघड झाल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले गोंधळले आहेत ! – पंतप्रधान
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरून पंतप्रधानांची हिंदुद्वेष्ट्यांवर कठोर टीका
नवी देहली – ‘द कश्मीर फाइल्स’सारखे चित्रपट बनायला हवेत. अशा चित्रपटांतून सत्य जनतेसमोर येत असते. गेल्या अनेक दशकांपासून जे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला, ते समोर आणले जात आहे. त्यामुळे जे लोक सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते आज विरोध करत आहेत. नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा झेंडा घेऊन फिरणारी ‘जमात’ गेल्या ५-६ दिवसांपासून गोंधळेली आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुद्वेष्ट्यांना लगावला. ते भाजपच्या संसदीय बैठकीत बोलत होते. देशातील काही ठिकाणी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित करण्यावरून वाद निर्माण होत आहे. त्यावरून पंतप्रधान मोदी यांनी वरील विधान केले.
सौजन्य रिपब्लिक टीवी
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की,
१. या चित्रपटातील तथ्य आणि कला यांवर चर्चा करण्याऐवजी हा चित्रपटच नकारण्याची मोहीम राबवली जात आहे.
२. चित्रपट बनवणार्यांना जे सत्य दिसले, ते त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला.
३. माझा चित्रपट हा विषय नाही. माझा विषय आहे की, सत्य देशासमोर आणणे, हे देशाच्या भल्यासाठी असते. त्याचे विविध पैलू असतात. एकाला एक गोष्ट दिसते, तर दुसर्याला दुसरी. एखाद्याला वाटते की, हा चित्रपट योग्य नाही, तर त्याने दुसरा बनवावा; मात्र अशा लोकांना त्रास होत आहे की, ज्यांनी सत्य इतके दिवस दाबून ठेवले होते आणि आता ते तथ्यांसमवेत समोर आणले जात आहे. कुणीतरी परिश्रम करून प्रयत्न करत आहे. अशा वेळी सत्यासाठी जगणार्या लोकांचे दायित्व आहे की, त्यांनी सत्याच्या मागे उभे रहावे. हे दायित्व प्रत्येकाने निभावले पाहिजे.
आणीबाणीसारख्या मोठ्या घटनेवर कुणी चित्रपट का बनवला गेला नाही ?
मोदी पुढे म्हणाले की, देशात आणीबाणीची इतकी मोठी घटना होऊनही त्यावर अद्याप कुणीही वास्तविकता दाखवणारा चित्रपट बनवलेला नाही. सत्य दाबण्याचा सातत्याने प्रयत्न केला गेला.
फाळणीच्या सत्यावर आधारित चित्रपट का बनवला गेला नाही ?
मोदी यांनी भारताच्या फाळणीविषयी म्हटले की, जेव्हा आम्ही फाळणीच्या झालेल्या नरसंहाची आठवण रहाण्यासाठी १४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणीची भीषणता’ म्हणून घोषित केला, तेव्हा ते अनेकांना अडचणीचे वाटले. भारताच्या फाळणीची वास्तविकता दाखवणारा चित्रपट अद्याप का बनला नाही ? कधी कधी अशा वास्तविकेतून शिकायला मिळते. देश अशा गोष्टी कसा विसरू शकतो ?