रशियाकडून युद्धाच्या २० व्या दिवशीही युक्रेनवर आक्रमणे चालूच !

कीव (युक्रेन) – रशियाकडून येथील रहिवासी इमराती आणि एक मेट्रो स्थानक यांवर १५ मार्चच्या सकाळी हवाई आक्रमणे करण्यात आली. एका इमारतीवर केलेल्या आक्रमणात २ जण ठार झाल्याचे वृत्त ‘बीबीसी’ने दिले आहे. रशियन आणि युक्रेनियन प्रतिनिधी यांच्यातील वार्ता पुन्हा चालू व्हायच्या आहेत.

१. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी उभय देशांमधील चर्चेसंदर्भात ‘सकारात्मक रहाणार’, असे सांगणारा व्हिडिओ प्रसारित केला आहे.

२. तिथे पोलंड, झेक रिपब्लिक आणि स्लोवेनिया या युरोपीय देशांचे पंतप्रधान कीव येथे येऊन झेलेंस्की यांची भेट घेणार आहेत.

३. कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी शहरात ३५ घंट्यांसाठी संचारबंदी लागू केली असून ‘सध्याचा काळ हा शहरासाठी कठीण आणि भयावह आहे. मी सर्व कीववासियांना आवाहन करतो की, त्यांनी घरातच थांबावे’, असे म्हटले आहे.

४. दुसरीकडे रशियन सैन्य पुढे सरकू शकलेले नाही, असा दावा अमेरिकेतील एका वरिष्ठ संरक्षण अधिकार्‍याने केला आहे. युरोपियन युनियनने रशियावर अधिक कडक प्रतिबंध घालत उच्चभ्रूंसाठी असलेल्या ऐषारामाच्या विविध वस्तूंच्या निर्यातीवर अतिरिक्त अधिभार, तसेच ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यावर आळा घातला आहे.

५. रशियाच्या एका वृत्तवाहिनीवर निवेदक बातम्या देत असतांना मरिना ओवस्यानिकोवा या संपादक मंडळातील एक महिला रशियाचा निषेध करणारे लिखाण लिहिलेला फलक हातात घेऊन कॅमेर्‍यासमोर येऊन उभी राहिल्या. फलकावर ‘युद्ध नको, युद्ध थांबवा, त्यांच्या प्रचारावर विश्‍वास ठेवू नका, ते (वृत्तवाहिनी) येथे खोटे बोलत आहेत.’, असे लिहिले होते. संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे. व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी महिलेच्या या कृत्याला ‘गुंडगिरी’ संबोधले आहे.