पेनड्राईव्ह बॉम्बप्रकरणाची ‘सीआयडी’द्वारे चौकशी करणार ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मुंबई, १५ मार्च (वार्ता.) – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे सादर केलेल्या पेनड्राईव्ह प्रकरणाची संपूर्ण चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (‘सीआयडी’च्या) वतीने करणार आहोत. यामध्ये कुणालाही पाठीशी घालणार नाही, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी १४ मार्च या दिवशी विधानसभेत केली; मात्र फडणवीस यांनी पाटील यांची घोषणा फेटाळून या प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (‘सीबीआय’च्या) वतीने चौकशीची मागणी केली.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, वर्ष १९९३ मध्ये बॉम्बस्फोट झाला आणि वर्ष २०२२ मध्ये गुन्हा नोंद होत आहे. या प्रकरणाची सीबीआयद्वारे चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. ज्या पोलीस दलाचा फडणवीस यांना अभिमान आणि विश्‍वास आहे, त्यावर विरोधकांचा विश्‍वास का नाही ? फडणवीस यांनी ३ पेनड्राईव्ह दिले; आपण काय ‘डिटेक्टिव्ह एजन्सी’ चालू केली का ? फडणवीस यांनी पेन ड्राईव्हमध्ये सगळी माहिती दिली नाही. काही राखून ठेवली आहे.

ते म्हणाले की, सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात मुंबईत गुन्हा घडल्यानंतर बिहारमध्ये गुन्हा नोंद केला जातो. त्यानंतर हे प्रकरण ‘सीबीआय’कडे दिले जाते. विशेष सरकारी अधिवक्ता प्रवीण चव्हाण यांनी सरकारी अधिवक्तापत्राचे दिलेले त्यागपत्र आम्ही स्वीकारले आहे. या प्रकरणामागे नेमके कोण आहे ?, हे पडताळावे लागेल. नवाब मलिक ५ वेळा आमदार झाले, तेव्हा त्यांना लक्ष्य केले जात नाही; मात्र केंद्र सरकारच्या विरोधात बोलल्यामुळे मलिक यांच्यावर कारवाई झाली.

२२ वर्षांत दिलीप वळसे पाटील इतके हतबल झालेले मी पाहिले नाही ! – देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

गेल्या २२ वर्षांत दिलीप वळसे पाटील इतके हतबल झालेले मी पाहिले नाही. देशमुख यांच्या विरोधात भाजपने नाही, तर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा नोंद झाला आहे. जळगाव येथील रायसोनी संस्थेतील मुख्य गुन्हेगारांचे अधिवक्ता प्रवीण चव्हाण हेच होते आणि आता सरकारी अधिवक्ता हेच कसे आहेत ? धाड कशी घालायची ? पुरावे कसे सिद्ध करायचे ?, हे सरकारी अधिवक्त्याचे काम नाही. प्रवीण दरेकर राज्य सरकारवर टीका करतात म्हणून त्यांच्यावर गुन्हा नोंद करणार; हे आम्हाला माहिती आहे; मात्र आमचा न्यायालयावर विश्‍वास आहे.

वक्फ मंडळावर डॉ. मुदस्सीर लांबे यांची नियुक्ती सरकारने केलेली नाही !

‘वक्फ मंडळावर डॉ. मुदस्सीर लांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. मुदस्सीर यांचे दाऊदशी संबंध आहेत’, असा आरोप करतांनाच या सरकारने चक्क दाऊदची माणसे वक्फ मंडळावर नियुक्त केली आहेत, असा संताप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्यक्त केला. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, डॉ. मुदस्सीर लांबे यांच्याविषयी तुमच्याकडे असलेली माहिती चुकीची आहे. या व्यक्तीची नेमणूक सरकारने केली नाही. याविषयीची निवडणूक ३० ऑगस्ट २०१९ या दिवशी पार पडली होती. ते निवडून आलेले सदस्य आहेत. विनाकारण ‘दाऊद दाऊद’ करू नका. जर त्यांचा दाऊदशी संबंध असेल, तर त्यांना काढून टाकण्याविषयी कारवाई करू.