‘दाऊदची माणसे वक्फ महामंडळावर बसवण्यात आली आहेत का ?’ – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरकारच्या विरोधातील आणखी एक पेनड्राईव्ह अध्यक्षांना दिला !
मुंबई, १४ मार्च (वार्ता.) – वक्फ मंडळावर नियुक्त करण्यात आलेल्या एका पदाधिकार्यांचे कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम कासकर याच्याशी संबंध आहेत. महाराष्ट्रात बाँबस्फोट घडवणार्या दाऊदची माणसे वक्फ महामंडळावर बसवण्यात आली आहेत का ? बाँबस्फोट घडवणार्याशी संबंध असतील, तर राज्याचे भले होईल का ? असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. विधानसभेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर चर्चा करतांना ते बोलत होते. त्यांनी १४ मार्च या दिवशी विधानसभेत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आणखी एक ‘पेन ड्राइव्ह’ विधानसभेचे तालिका सभापती भास्कर जाधव यांच्याकडे सुपुर्द केला.
या संदर्भात फडणवीस म्हणाले की,
१. वक्फ मंडळावर दाऊदची माणसे घेतली ती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी नियुक्त केली आहेत.
२. ‘वक्फ महामंडळात पैसे कसे कमवायचे ? याविषयीचा संवाद असलेला ‘पेन ड्राईव्ह’ मी देत आहे. वक्फ मंडळाचे पदाधिकारी डॉ. मुदस्सीर लांबे आणि महंमद अर्शद खान यांचा एकमेकांशी झालेला संवाद यात आहे. या संवादात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीशी संबंध असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. अल्पसंख्यांक विभागातील लोकांचा दाऊद याच्याशी संबंध आला, तरच त्यांना काम द्यायचे, असे सरकारने काही ठरवले आहे का ? ज्या दूरभाषवरून महंमद अर्शद खानसमवेत संवाद झाला, ते मी सभागृहात दिले आहे. महंमद अर्शद खान हा ठाणे येथील कारागृहात आहे. त्याचा भ्रमणभाष पोलिसांकडे आहे. तो तात्काळ कह्यात घ्यावा.
३. डॉ. लांबे यांना अल्पसंख्यांक विभागाने वक्फ मंडळावर सदस्य म्हणून नियुक्त केले आहे. ३१ डिसेंबर २०२० या दिवशी लांबे यांच्या विरोधात एका ३३ वर्षीय महिलेने बलात्काराची तक्रार प्रविष्ट केली होती. त्या तक्रारीत विवाहाचे आमीष दाखवून बलात्कार करण्यात आल्याचे म्हटले आहे. या महिलेने आत्महत्या करण्याची चेतावणी दिली, तरीही डॉ. लांबे यांच्यावर कारवाई केली नाही. २८ जानेवारी २०२२ या दिवशी डॉ. लांबे यांनी या महिलेच्या पतीच्या विरोधात चोरीचा गुन्हा नोंद केला.
डॉ. मुदस्सीर लांबे आणि महंमद अर्शद खान यांच्या संवादातील काही भाग पुढीलप्रमाणे आहे –
या संवादात डॉ. लांबे म्हणतात, ‘‘माझे सासरे ‘दाऊद’चे ‘राईट हँड’ होते. माझे लग्न हसीना आपा, इक्बाल कासकरची पत्नी यांच्या मध्यस्थीने केले होते. त्यामुळे जरा काही झाले, तर वरपर्यंत प्रकरण पोचते. माझे सासरे संपूर्ण कोकण सांभाळायचे. मुंबईत माझे काका होते. मी मदनपुरात होतो. माझ्या घरात काही झाले, तर थेट भाईपर्यंत वाद पोचतो. आपल्याकडे पाहिजे तेवढा पैसा आहे. वक्फचे काम करा. जे काही होईल त्यात तुझे अर्धे आणि माझे अर्धे.’’