देवेंद्र फडणवीस यांना नोटीस दिल्याप्रकरणी भाजपचे आंदोलन !
राज्यभरात नोटिसीची होळी करणार !
मुंबई – राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राजकीय नेत्यांचे दूरभाष ध्वनीमुद्रित केल्याप्रकरणी ‘बीकेसी’तील सायबर पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्याविषयी नोटीस पाठवण्यात आली आहे. या विरोधात भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार असून त्याची धग पुणे येथे चालू झाली आहे. आंदोलनाच्या वेळी भाजपच्या वतीने या नोटिसीची होळी करण्यात येणार आहे. फडणवीसांच्या सत्ताकाळात राजकीय नेत्यांचे दूरभाष अनधिकृतपणे ध्वनीमुद्रित करण्यात आले, असा आरोप सरकारने केला. याच प्रकरणात विरोधी पक्षनेते फडणवीस यांना सायबर पोलिसांनी नोटीस बजावली. विकासकामांच्या उद्घाटनासाठी फडणवीस पुण्यात येणार होते; पण १३ मार्च या दिवशी मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी पोलिसांनी त्यांचा जबाब घेतला. त्यामुळे ते पुणे येथे जाऊ शकले नाहीत. त्या धर्तीवर पुणे येथे कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणा देऊन आंदोलनाला प्रारंभ केला.