(म्हणे) ‘देशविरोधी सरकार जुन्या जखमा कोरून रक्त भळभळत राहील, हे पहाते !’
हिंदूंवरील अत्याचारांविषयी असंवेदनशीलतेची सीमा गाठणारे महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांचे वक्तव्य !
यत्किंचित्ही देशप्रेम नसणार्या आणि सतत धर्मांधांचे उमाळे येणार्या काँग्रेसवाल्यांना हिंदूंवरील अनन्वित अत्याचाराविषयी काहीच वाटत नाही, हे लक्षात घ्या ! या हिंदुद्वेषामुळेच काँग्रेस मृतवत होत चालली आहे, हेही त्यांच्या लक्षात येत नाही ! – संपादक
मुंबई – ‘द कश्मीर फाइल्स’ बनवण्याचा उद्देश काश्मिरी पंडितांविषयी कणव नाही, तर राजकीय आहे. ऐतिहासिक घटनांची मोडतोड आणि चित्रपट बनवणारे भाजपसंबंधित असणे हा योगायोग नाही. पंडितांनी ‘काश्मीरमध्ये परत कधी जायचे ?’, हे मोदी सरकारला विचारावे. देशविरोधी सरकार जुन्या जखमा कोरून त्या भळभळत रहातील, हे पहात आहे, असे हिंदूंच्या वंशविच्छेदाचेही राजकारण करणारे अश्लाघ्य ट्वीट महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केले आहे.
१. चित्रपटगृहातून बाहेर पडणार्या आणि ‘जय श्रीराम’ घोषणा देणार्या हिंदुत्वनिष्ठांना उद्देशून त्यांनी म्हटले आहे, ‘‘जय श्रीरामच्या घोषणा द्या; पण श्रीरामाने रावणाचा द्वेष केला नाही आणि कैकेयीला क्षमा केली हे पहा. श्रीरामाने दाखवलेला मार्ग हा नव्हे.’’ (नेहमी हिंदूंना फुकाचे सल्ले देणारे काँग्रेसवाले ! याचा अर्थ हिंदूंनी त्यांच्यावर अत्याचार करणारे, हिंदु महिलांवर बलात्कार करणारे यांना शिक्षा होण्यासाठी काहीही न करता त्यांना क्षमा करायची, असा होतो. असा सल्ला धर्मांधांना देण्याचे धारिष्ट्य सावंत करतील का ? – संपादक)
२. सावंत यांनी पुढे म्हटले आहे की, पंडितांचे काश्मीरमधून अत्याचारांमुळे बलपूर्वक विस्थापन झाले, त्या वेळी केंद्रात भाजप समर्थित व्ही.पी. सिंग सरकार होते आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट होती. तेथील राज्यपाल जगमोहन पुढे भाजपचे चार वेळा खासदार आणि केंद्रीय मंत्री झाले.