वारकर्यांच्या ट्रॅक्टरला भरधाव ट्रकने धडक दिल्याने ५ वारकरी ठार, तर अनेकजण घायाळ !
सोलापूर – एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जात असलेल्या भाविकांच्या ट्रॅक्टरला ट्रकने मागून धडक दिली. या अपघातात ५ भाविक ठार झाले असून १९ भाविक घायाळ झाले आहेत. घायाळ झालेल्या चौघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी गावाजवळ १३ मार्चच्या रात्री घडली.
१४ मार्च या दिवशी आमलकी एकादशी असल्याने तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील ४० ते ४५ वारकरी ट्रकमधून पंढरपूर येथे जात होते. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकचालकाने ट्रॅक्टरला १०० ते १५० फुटांपर्यंत फरफटत नेले.
मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये साहाय्य देण्याची अखिल भाविक वारकरी मंडळाची मागणी
अपघातामध्ये ट्रक ड्रायव्हर उत्तरदायी असून त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, तसेच मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये आणि घायाळ झालेल्यांचे सर्व उपचार प्रशासनाने करून प्रत्येकी १ लाख रुपये निधी मिळवून देण्यात यावा, अशी मागणी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी वारकरी मंडळाचे प्रमुख ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, जिल्हाध्यक्ष ज्योतिराम चांगभले, शहराध्यक्ष संजय पवार, पूर्व विभाग अध्यक्ष शाम येदूर आदी उपस्थित होते.