साधकांना आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करणार्या आणि साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीचा ध्यास असणार्या सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्याविषयी सोलापूर येथील साधकांना जाणवलेली सूत्रे
एकदा सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सोलापूर येथे आल्यानंतर त्यांनी साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेण्यासंदर्भात सत्संग घेतला होता. त्या सत्संगात सद्गुरु स्वातीताईंचे तेज मला पुष्कळ प्रखरपणे जाणवत होते आणि त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्या चैतन्यामुळे साधकांना आध्यात्मिक अनुभूती आल्या.
१. श्री. राजन बुणगे यांना जाणवलेली सूत्रे
१ अ. सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी पुष्कळ तळमळीने सांगितलेल्या साधनेविषयीच्या प्रयत्नांमुळे स्वतःच्या साधनेच्या स्थितीची खंत वाटणे आणि साधना करण्यासाठी प्रोत्साहन मिळणे : ‘सद्गुरु स्वातीताईंनी आमचा सत्संग घेऊन ‘आमची साधना व्हावी’, यासाठी तळमळीने सूत्रे सांगितली. त्या वेळी ‘मी अल्प प्रयत्न करत असूनही सद्गुरु स्वातीताई पुष्कळ प्रेमाने आणि तळमळीने माझ्या व्यष्टी साधनेविषयी सूत्रे सांगत आहेत’, या विचारामुळे मला स्वतःविषयी खंत वाटली. सद्गुरु स्वातीताईंची तळमळ पाहून ‘आता सद्गुरु स्वातीताईंनी सांगितलेल्या सर्व सूत्रांचे आज्ञापालन करायचे आहे. सद्गुरु स्वातीताईंना माझ्यासाठी कोणताच त्रास व्हायला नको’, असे विचार माझ्या मनात आले. सद्गुरु स्वातीताईंच्या तळमळीमुळे माझे मायेकडे ओढ घेणारे सुप्त मन जागृत झाले. त्याला ध्येयाची दिशा मिळाली.
१ आ. सण असूनही ‘साधकांची साधना व्हावी’, यासाठी सोलापूर सेवाकेंद्रात रहाणे, तसेच शारीरिक व्याधी असूनही स्वयंपाकघरात सेवा करणे : ‘श्री गणेशचतुर्थी’ हा सण असतांनाही सद्गुरु स्वातीताई ‘केवळ साधकांची साधना व्हावी’, यासाठी सोलापूर सेवाकेंद्रात राहिल्या. सद्गुरु स्वातीताई सोलापूर सेवाकेंद्रात जितके दिवस थांबल्या, तेवढ्या दिवसांत त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन प्रतिदिन एक पदार्थ बनवला आणि स्वयंपाकघरात सेवा केली. त्यांना पायदुखी आणि अंगदुखी यांचा पुष्कळ त्रास होत होता; पण ‘सद्गुरु स्वातीताईंनी स्वयंपाकघरात सेवा केली नाही’, असे एकही दिवस झाले नाही. ‘कुणाला काय आवडते ? कुणाला काय चालत नाही ?’, हे सर्व त्या पहातात.
१ इ. सद्गुरु स्वातीताईंचे प्रत्येक साधकावर मातृवत प्रेम आहे. त्यांनी आम्हाला सतत साधनेविषयी सांगितले.
१ ई. सोलापूर सेवाकेंद्रातील वस्तूंची सात्त्विक रचना करून घेणे : सद्गुरु स्वातीताई सेवाकेंद्रात आल्यावर त्या येथील आवश्यक आणि अनावश्यक साहित्य याचे निरीक्षण करतात. त्या त्याविषयी योग्य निर्णय सांगतात. ‘सेवाकेंद्रात अधिक चांगली स्पंदने कशी येतील ? अजून सात्त्विकता कशी वाढेल ?’, यादृष्टीने त्या वस्तू, लोखंडी कपाट (रॅक) आणि बाहेरील चप्पलचे कपाट यांची सात्त्विक रचना करून घेतात.
१ उ. श्रीकृष्णजन्माष्टमीला पूजेची भावपूर्ण सिद्धता करवून घेतल्यामुळे श्रीकृष्ण हसत असल्याची अनुभूती येणे : श्रीकृष्णजन्माष्टमीला सद्गुरु स्वातीताईंनी श्रीकृष्णाच्या पूजेची सिद्धता इतकी मन लावून केली होती की, ते वर्णन करण्यासाठी शब्दच नाहीत. त्या वेळी ‘श्रीकृष्ण प्रसन्न होऊन पुष्कळ हसत आहे’, असे मला जाणवले. ‘सर्वांना श्रीकृष्णाचे चैतन्य मिळावे आणि साधक साधनेमधे लवकर पुढे जाऊन त्यांची प्रगती व्हावी’, यासाठी त्या प्रयत्नरत असतात. मी त्यांचा लाभ करून घेण्यात अल्प पडतो.
१ ऊ. विश्रांती न घेता सतत सेवारत असणे : सद्गुरु स्वातीताई कधीच विश्रांती घेत नाहीत. त्यांना कितीही शारीरिक त्रास, दुखणे, सर्दी झाली, तरी त्या सेवा करतात. त्या त्यांच्या खोलीत गेल्या, तरी भ्रमणभाषवरून सत्संग घेतात.
१ ए. साधकांची साधनेत प्रगती होण्यासाठी विष्णुलीला सत्संगाच्या माध्यमातून साधकांकडून प्रयत्न करवून घेणे : आमची साधनेत प्रगती व्हावी, आमच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची घडी बसावी; म्हणून सद्गुरु स्वातीताईंनी ‘विष्णुलीला सत्संग’ चालू केला. ‘आम्हाला साधनेची दिशा आणि सेवेची प्रेरणा मिळावी अन् आमच्याकडून भावजागृतीचे प्रयत्न व्हावेत’, यासाठी सद्गुरु स्वातीताई इतक्या आर्ततेने प्रयत्न करतात की, त्यामुळे पुष्कळ साधकांचा भाव जागृत होऊन त्यांना अनुभूती येतात आणि कित्येक जणांना देवतांच्या अनुभूती येतात.
१ ऐ. साधकांनी चूक सांगितल्यावर सद्गुरु स्वातीताई प्रेमाने समजून घेत असल्याने साधकांच्या मनावर ताण न येणे : साधकांनी त्यांच्याकडून झालेली गंभीर चूक सद्गुरु स्वातीताईंना प्रांजळपणे सांगितल्यावर सद्गुरु स्वातीताई इतक्या प्रेमाने समजून घेतात आणि समजून सांगतात की, साधकांच्या मनावर कोणताच ताण रहात नाही. साधकांना पुष्कळ ऊर्जा मिळते आणि त्यांना उत्साह वाटतो. सद्गुरु स्वातीताईंच्या प्रत्येक कृतीतून गुरूंप्रतीचा शरणागतभाव दिसून येतो. ‘सद्गुरु स्वातीताई प्रार्थना सांगत असतांना प्रार्थना हृदयापर्यंत पोचत आहे’, अशी मला जाणीव होते.’
२. ‘सद्गुरु स्वातीताईंकडून मिळणार्या चैतन्यामुळे सत्संग संपल्यानंतर मला पुष्कळ हलके वाटून सतत आनंद जाणवत होता.’ – कु. वर्षा जेवळे
३. अनुसंधानात वाढ होणे
‘सत्संग संपल्यानंतर मला दोन दिवस आतून सतत आनंद जाणवत होता. माझी गुरुदेवांशी असलेल्या अनुसंधानात वाढ झाली होती.’ काही दिवस अल्प वेळ त्यांच्याशी बोलल्यानंतर, तसेच सत्संग झाल्यावरही मला तशीच अनुभूती येत होती. मला ‘सतत याच स्थितीत रहावे’, असे वाटत होते.’ – श्री दत्तात्रय पिसे, सोलापूर
४. कृतज्ञता
केवळ साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीच्या ध्यास असणार्या आणि सतत आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करणार्या, तसेच सतत चैतन्य देण्याच्या स्थितीत स्थिर असणार्या सद्गुरु स्वातीताईंच्या आणि हा आध्यात्मिक लाभ सर्वांना देणारे, सृष्टीच्या उद्धारासाठी अवतरलेले करुणाकर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
– सोलापूर येथील साधक (८.९.२०१९)
सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतांना साधकाला सुचलेली काव्यपंक्ती !
आम्हा पामरांवर असो अखंड कृपादृष्टी सद्गुरु स्वातीताई तुमची ।गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ‘गुरूंप्रती कशी कृतज्ञता व्यक्त करावी ?’, असा विचार माझ्या मनात आला. ‘मी साधनेत अल्प पडत आहे. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्यामुळे माझ्या साधनेला गती आणि दिशा मिळत आहे. त्यांच्यामुळे माझा भाव जागृत होत आहे’, असे मला वाटले आणि गुरुकृपेने मनात आलेले शब्द लिहिले गेले. माझ्या डोळ्यांत अश्रू दाटून होते. ‘ते अश्रू मुक्त व्हावेत’, असे मला वाटत होते आणि तसे अश्रू ओघळतही होते. त्या दिवशी सुचलेले काव्य पुढे देत आहे. सद्गुरु स्वातीताई, तुमची अमृतवाणी । देई चैतन्य अन् शक्ती । तुमच्या प्रीतीने स्वभावदोष अन् अहं निर्मूलन होई ।। १ ।। आमचा हात धरून प्रत्येक क्षणी नेता गुरुचरणी । प्रीती अन् कृपा यांचे आपण साक्षात् भांडार असती । समष्टी आणि अव्यक्त भाव शिकवता प्रत्येक क्षणी । गुरुचरणांची ओढ वाढवली सद्गुरु स्वातीताई तुम्ही ।। २ ।। किती स्तुतीसुमने उधळू आपल्यावरी ती अपुरीच असती । अशी कृपादृष्टी आम्हा पामरांवर अखंड असो सद्गुरु ताई तुमची । हीच कृतज्ञतेने प्रार्थना श्री गुरुचरणी आणि आपुल्या चरणी’ ।। ३ ।। – श्री. राजन बुणगे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सोलापूर (५.७.२०२०) |
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |