साधकांना व्यष्टी आणि समष्टी साधना यांत साहाय्य करणार्‍या पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी !

पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी

१. ‘पू. रत्नमालाताईंना शारीरिक वेदना पुष्कळ होत असल्या, तरीही त्या सतत हसतमुख, आनंदी आणि सेवारत असतात.

२. त्यांचे रहाणीमान साधे आहे. त्या सर्वांशी सहजतेने बोलतात.

कु. नलिनी राऊत

३. इतरांचा विचार करणे

एकदा दुपारी मला तातडीने एक ‘मेल’ पाठवायचा होता. मी पू. ताईंना याविषयी सांगितले. त्या वेळी त्या महाप्रसाद घेण्यासाठी निघाल्या होत्या, तरी त्यांनी थांबून त्यांच्या भ्रमणसंगणकावर मला ‘मेल’ पाठवायची सुविधा उपलब्ध करून दिली आणि नंतरच त्या महाप्रसाद घेण्यासाठी गेल्या.

४. प्रीती

अ. मी २ वर्षांपूर्वी पुष्कळ रुग्णाईत होते. त्या वेळी त्या माझी सातत्याने विचारपूस करायच्या. मला होमिओपॅथीची दोन औषधे प्रत्येक १५ मिनिटांनी १ – १ चमचा द्यायची होती. एकदा पू. ताई सेवेच्या ठिकाणी एकट्याच होत्या. तेव्हा त्या सेवेत असतांनाही प्रत्येक १५ मिनिटांनी खोलीत येऊन मला औषध देत होत्या.

आ. काही मासांपूर्वी त्यांच्या विभागात त्या सेवेच्या ठिकाणी एकट्याच होत्या. त्यांच्या दोन्ही सहसाधिका घरी गेल्या होत्या. त्यातील एक साधिका आश्रमात आल्यावर अन्य ठिकाणी रहात होती. त्या वेळी तिच्यासाठी प्रसाद-महाप्रसाद यांचे डबे भरणे, तिला डबे नेऊन देणे, तिला हवे-नको ते पहाणे, हे पू. ताई एकट्या असूनही आनंदाने करत होत्या.

५. स्थिर

‘मला पुष्कळ सेवा आहेत’, असे त्या कधीही सांगत नाहीत. ‘त्या सेवेत व्यस्त आहेत, घाईत आहेत’, असे त्यांच्या वागण्या-बोलण्यातूनही कधी जाणवत नाही. त्या प्रत्येक परिस्थितीत शांत आणि स्थिर असतात.

६. तत्त्वनिष्ठता

पू. ताई आमच्या व्यष्टी आणि समष्टी साधना यांतील चुका शांतपणे अन् परखडपणे सांगतात. त्यांनी सांगितलेल्या चुका अंतर्मनात जातात आणि साधकांकडून त्या सुधारण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न होतात.

७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव

पू. ताई आमचा व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. तेव्हा त्या ‘परात्पर गुरुदेव आपल्यासाठी किती करतात ! आपण त्यांना आनंद देण्यासाठी व्यष्टी अन् समष्टी साधना किती तळमळीने करायला हवी !’, हे इतक्या भावपूर्णरित्या मनावर बिंबवतात की, त्यातून आपल्याला व्यष्टी आणि समष्टी साधना गांभीर्याने अन् झोकून देऊन करण्याची प्रेरणा मिळते.

८. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘गुरुमाऊलीच्या कृपेमुळे आम्हाला अशा संतांचा सहवास मिळत आहे’, त्याबद्दल गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘पू. ताईंचे हे गुण आमच्यातही येवोत’, ही शरणागतीने प्रार्थना !’

– सुश्री (कु.) नलिनी राऊत (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.३.२०२२)