आईप्रमाणे संपूर्ण कुटुंबाला आधार देणार्या आणि कुटुंबियांना साधनेत ठेवणार्या सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये !
होळी पौर्णिमा (१७ मार्च २०२२) या दिवशी सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…
सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्याविषयी काही सांगायचे म्हणजे कृतज्ञताच वाटते. जसे आई आपल्या लेकरावर माया करत असते, बहीण आपल्या भावावर प्रेम करत असते, तशा सद्गुरु स्वातीताई सर्वांवर प्रेम करतात. त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्या चरणी त्यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. सर्व कुटुंबीय साधनेत येणे आणि सद्गुरु स्वातीताईंच्या मार्गदर्शनानुसार बहिणीची अध्यात्मात प्रगती होणे
वर्ष २००६ मध्ये आम्ही सर्व कुटुंबीय साधनेत आलो. त्या वेळी माझी सद्गुरु स्वातीताईंशी (सद्गुरु कु. स्वाती खाड्ये यांच्याशी) विशेष ओळख नव्हती. मला साधनेत एवढी रुचीही नव्हती; पण माझ्या बहिणीला (कु. वैभवी भोवर (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) हिला साधनेत आल्यावर) आमच्या जवळच असलेल्या कुडाळ सेवाकेंद्रात जायला आणि सेवा करायला आवडत असे. पुढे ती पूर्णवेळ साधना करू लागली आणि सद्गुरु ताईंच्या मार्गदर्शनानुसार साधना करून तिची अध्यात्मात प्रगती झाली.
२. शिक्षण घेत असतांना सेवा करणे आणि सद्गुरु ताईंनी सेवेचे कौतुक करून प्रोत्साहन देणे
मी शिक्षण घेत असतांना वर्ष २०१४ मध्ये उज्जैन येथे कुंभमेळा होता. त्यासाठी सद्गुरु ताईंनी आई-बाबा आणि माझ्या सेवेचे नियोजन केले होते. त्या वेळी मला जाण्याची इच्छा नव्हती; पण ‘मी तिकडे सेवेला यावे आणि त्यातील आनंद मला मिळावा’, ही सद्गुरु ताईंची तळमळ होती. तिकडे गेल्यावर मला सेवा करतांना २० दिवस वेगळाच आनंद मिळाला. सेवा करतांना सद्गुरु ताई मला सतत भेटायच्या आणि माझे कौतुक करून सेवेतील उत्साह वाढवायच्या. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदु राष्ट्र-जागृती सभा असतांना तिथे साहित्याची सेवा करतांना सद्गुरु ताई माझ्या सेवेचे कौतुक करून मला प्रोत्साहन द्यायच्या. त्या वेळी मला पुष्कळ कृतज्ञता वाटत असे.
३. सद्गुरु ताई संपूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ असणे
माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी पुण्याला नोकरी करू लागलो. तेथे मला वेळेवर पगार मिळत नसल्याने मी नोकरी सोडून घरी आलो. त्या वेळी सद्गुरु ताई मला म्हणाल्या, ‘‘जशी वैभवी तुझी बहीण आहे, तशीच मी आहे. तुझे आई-बाबा मला माता-पित्याप्रमाणे आहेत.’’ त्यांनी आमच्या कुटुंबाचा पुष्कळ विचार केला आणि मला भाऊ मानले. त्या वेळी मला ताईंप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. या प्रसंगाला ४ वर्षे झाली, तरी तो प्रसंग आठवल्यावर माझी भावजागृती होते. सद्गुरु ताई अजूनही प्रत्येक भाऊबिजेला मला नमस्कार पाठवतात, तसेच रक्षाबंधनाला राखीचे एक चित्र पाठवतात. यावरून त्यांचे माझ्यावर असलेले प्रेम मला अनुभवायला मिळते.
४. आश्रमात राहून सेवा आणि साधना केल्यावर त्यातून आनंद मिळणे अन् पूर्ण वेळ साधनेला आरंभ करणे
सद्गुरु ताईंनी मला मनाची पूर्णवेळ सिद्धता होण्यासाठी काही दिवस रामनाथी आश्रमात सेवेला जाण्यास सांगितले. मी आश्रमात आल्यावर माझी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया चालू झाली; परंतु मला प्रक्रियेची भीती वाटत होती. त्यामुळे मला ताण यायचा. सद्गुरु ताईंनी मला प्रक्रिया आणि साधना यांविषयी सकारात्मक दृष्टीकोन दिले. हळूहळू त्यांच्या संकल्पानेच मला व्यष्टी साधना करतांना प्रक्रियेतील आनंद मिळायला लागला आणि माझ्या मनात पूर्णवेळ साधना करण्याचे विचार यायला लागले. त्यानंतर मी पूर्णवेळ साधना करू शकलो. पूर्णवेळ झाल्याचा आनंद माझ्यापेक्षा सद्गुरु ताईंनाच अधिक झाला.
५. अगदी घरच्या सदस्याप्रमाणे घरी येणे आणि गणेशोत्सवात सहभागी होणे
प्रतिवर्षी गणपतीला सद्गुरु ताई आमच्या घरी येतात. त्या घरी आल्यावर उत्साहाचे वातावरण निर्माण होते. त्यांना गणपतीची सजावट करायला आवडते. एकदा त्यांनी गणपतीसाठी स्वतः बनवलेला हार आणला होता. त्यांनी स्वत: गणपतीलाही ओवाळले. तेव्हा ‘संतांच्या हाताने आरती घेतांना गणपतीला आनंद होत आहे’, असे मला जाणवले. ताई अगदी घरातील सदस्याप्रमाणे आमच्या समवेत असतात. प्रत्येक गोष्टीत इतरांचे कौतुक करणे, इतरांना उत्साही ठेवणे हे ताईंकडून शिकायला मिळाले.
६. पूर्णवेळ साधना चालू झाल्यानंतर सद्गुरु ताईंचे सतत मार्गदर्शन मिळणे
पूर्णवेळ साधना करतांना मला काही अडचणी यायच्या. साधकांच्या समवेत प्रसंग व्हायचे. मला होणार्या मानसिक त्रासामुळे मी काही प्रसंगांचा मनाला पुष्कळ त्रास करून घ्यायचो. त्यामुळे माझ्या मनात ‘घरी जाऊया’, असे विचार यायचे. त्या वेळी सद्गुरुताईंना संपर्क केल्यावर त्या मला मार्गदर्शन करायच्या. त्यामुळे मला सकारात्मक राहून साधना करता येते.
७. सद्गुरु ताईंनी सुचवलेले भावप्रयोग
अ. परात्पर गुरु डॉक्टरांना तळमळीने हाक मारायची. ‘ते आपल्याकडे लगेच (धावत) येत आहेत’, असा भाव ठेवायचा.
आ. मानसिक त्रास होत असतांना ‘भगवान शिव मला भस्म आणून देत आहे आणि ते मी माझ्या डोक्याला लावत आहे. तसेच ते मी ग्रहण करत आहे.’
इ. श्रीकृष्णाला आपण हाक मारून तळमळीने प्रार्थना करायची आणि त्याला सर्व मनाची स्थिती सांगायची.
ई. कापराचे उपाय करतांना ‘हिमालयात बसलो आहे’, असा भाव ठेवावा.
उ. सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांजवळ बसलो आहे.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी सतत कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते की, मी सनातन संस्थेत आलो आणि सद्गुरु स्वातीताईंसारखे अनेक संत परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हा साधकांना दिले. आज मी परात्पर गुरु डॉक्टर, सद्गुरु स्वातीताई आणि संत यांच्यामुळे साधनेत आहे. त्यासाठी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.
– श्री. संकेत भोवर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.३.२०२१)
सद्गुरु स्वातीताई, अनेक कुटुंबांचा बनला आहात आधार तुम्ही ।
ज्यांच्या वाणीतून होई हिंदु राष्ट्राचा जयजयकार ।
वाणीतील तेजाने हिंदु राष्ट्र स्थापण्या हिंदु युवक घेई पुढाकार ।। १ ।।
मार्गदर्शन वा सभा असो, दोन्हींचा समतोल साधण्या आहात तत्पर ।
साधकांत होई परिवर्तन अन् साधक करी पुढील मार्गक्रमण ।। २ ।।
सद्गुरु स्वातीताई, गुरुभक्तीच्या बळावर कार्य करता जलद गतीने ।
गुरुकार्य पुढे नेण्याची तळमळ असल्याने लढता तुम्ही जिद्दीने ।। ३ ।।
अनेक कुटुंबांचा बनला आहात आधार तुम्ही ।
‘गुरुमाता’ अन् ‘गुरुभगिनी’ ऐसे नाते निर्माण केले तुम्ही ।। ४ ।।
सर्वांची काळजी असते सदा तुमच्या मनी ।
त्याच ओढीने प्रत्येकाला साधनेत पुढे घेऊन जाता तुम्ही ।। ५ ।।
कृतज्ञता असे केवळ आमच्या मनी ।
तुमच्या प्रती भावाने भरले या नेत्रांत पाणी ।। ६ ।।
सदा ऐकायला मिळो विष्णुलीला वर्णन करणारी तुमची वाणी ।
वंदन करतो मी, तुमच्या कोमल चरणी, तुमच्या कोमल चरणी ।। ७ ।।
– श्री. संकेत भोवर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.३.२०२१)