असंवेदनशील रुग्णालय !

काही दिवसांपूर्वी एका आजारी नातेवाइकांच्या समवेत काही दिवस रुग्णालयात रहावे लागले होते. रुग्णालय तसे प्रशस्त होते. स्वच्छताही तशी बर्‍यापैकी ठेवण्यात आली होती; पण कर्मचार्‍यांच्या अयोग्य मानसिकतेचा प्रत्यय तेथे बर्‍याचदा आला. रुग्णालयाच्या विविध कक्षांमध्ये प्रतिदिन २ वेळा केर काढून लादी (फरशी) पुसली जायची. तेथील महिला कर्मचारी केर काढण्यासाठी आल्यावर आम्ही साहित्य आवरून ठेवायचो, म्हणजे त्यांना कचरा काढणे सोयीचे जाईल; मात्र त्यांच्याकडून केवळ दर्शनी भागातीलच कचरा वरवर काढून तेवढीच लादी पुसली जायची. रुग्णाच्या पलंगाखालून नीट कचरा काढून तो भाग स्वच्छपणे पुसायला हवा, इतकी साधी कृतीही त्यांच्याकडून होत नव्हती. याविषयी त्यांना जाणीव करून दिल्यावर त्या महिला सांगायच्या, ‘‘रुग्ण इथून गेल्यावर मग आम्ही तो सगळा भाग स्वच्छ करतो.’’ असे आहे, तर मग रुग्णाला अस्वच्छतेचा त्रास झाल्यास दायित्व कुणाचे ? खरेतर रुग्णालयातील प्रत्येक कोपरा हा स्वच्छ आणि नीटनेटकाच हवा.  इतका हलगर्जीपणा कशासाठी ? याविषयीची संवेदनशीलता रुग्णालय प्रशासनाने जोपासायला हवी.

रुग्णालयातील स्वागतकक्षात असणार्‍या कर्मचारी महिलांचे बोलणेही उर्मटपणाचे होते. साधी चौकशी करायला गेल्यावरही त्या नीट प्रतिसाद द्यायच्या नाहीत. रुग्णाला रुग्णालयात भरती करण्यासाठी काय करावे लागेल, याविषयीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी कुणी गेल्यास त्या संबंधितांना हातानेच खुणावून ‘जरा थांबा’ असे सांगायच्या. त्यामुळे आजारी असणार्‍या रुग्णाच्या नातेवाइकांना तेथे ताटकळत उभे रहावे लागायचे; पण याविषयी काही वाटत नसे. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी असा प्रकार घडायला नको. एका रुग्णाच्या पायाला लागल्याने त्याला प्लास्टर घातले होते. त्याला मलमपट्टी करण्यासाठी चाकांच्या आसंदीतून नेत असतांना पुरुष कर्मचार्‍याच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा पाय भिंतीला आपटला. त्यामुळे रुग्णाला पुष्कळ वेदना झाल्या. त्या वेळी साधी क्षमा मागण्याचे सौजन्य दाखवणे तर दूरच, उलट त्या पुरुष कर्मचार्‍याने रुग्णाला ‘तुम्ही नीट बसा’, असे सांगितले. याला काय म्हणावे ?

रुग्णालये उभारण्यामागील उद्देश रुग्णालय प्रशासनाने लक्षात घेऊन त्याविषयीचे गांभीर्य तेथील कर्मचार्‍यांमध्ये रुजवायला हवे. तसे झाल्यासच ती सेवा ही ईश्वर सेवा होईल.

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.