आरोपीप्रमाणे मला प्रश्न विचारले, सरकारच्या हाती काहीही लागणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

  • मुंबई सायबर पोलिसांकडून देवेंद्र फडणवीस यांची २ घंटे चौकशी !

  • राजकीय नेत्यांचे दूरभाष ध्वनीमुद्रण प्रकरण !

मुंबई – महाघोटाळ्याची माहिती मी सरकारला दिली असती, तर त्यांनी काहीही दिवे लावले नसते. त्यांनी हा महाघोटाळा दाबला असता. पोलिसांनी आज केलेल्या चौकशीतील प्रश्न साक्षीदाराप्रमाणे नव्हे, तर आरोपीला विचारल्याप्रमाणे होते. राजकीय सूडबुद्धीतून ही कारवाई होत असून अधिकार्‍यांवर दबाव टाकला जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १३ मार्च या दिवशी येथे पत्रकार परिषदेत केला.

१. राज्यातील राजकीय नेत्यांचे दूरभाष ध्वनीमुद्रण केल्याप्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘सागर’ या शासकीय बंगल्यात मुंबई सायबर पोलिसांकडून १३ मार्च या दिवशी चौकशी करून जबाब नोंदवण्यात आला. त्यांची अनुमाने २ घंटे चौकशी करण्यात आली. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

२. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यात स्थानांतराचा महाघोटाळा झाला. या स्थानांतराच्या घोटाळ्याची माहिती मी केंद्रीय गृहमंत्रालयाला दिली. या विषयावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. यात केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) चौकशी करत आहे. महाघोटाळा का घडला ?, याची चौकशी सरकार करू शकत नाही. सरकारने महाघोटाळा अहवाल ६ मास दाबून ठेवला. हा अहवाल मी बाहेर काढला नसता, तर घोटाळा दबला गेला असता. मला अचानक नोटीस पाठवण्याचे कारण म्हणजे विधानसभेच्या सभागृहात मी केलेले आरोप आणि सरकारचे कुख्यात आतंकवादी दाऊद याच्याशी असलेले संबंध, हे आहे.

३. ते पुढे म्हणाले की, मला विचारलेले प्रश्न आणि प्रश्नावली यांत मोठी विसंगती होती. ‘मी गोपनीयता कायद्याचा भंग केला’, असाच पोलिसांचा माझ्यावर रोख होता. साक्षीदारांचा जबाब घेतात, तसे प्रश्न नव्हते. याउलट आरोपी आणि सहआरोपी केले जाईल, अशा पद्धतीचे प्रश्न होते.

४. मी गोपनीय कागदपत्रे केंद्रीय गृहमंत्रालयाला दिली, ती घोषित केली नाहीत; पण अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ती माध्यमांना दिली. त्यांना गोपनीय माहिती उघड करण्याचा अधिकार नाही. तरीही त्यांनी हे काम केले. मी सरकारचे सर्व काळे कारनामे बाहेर काढणार आहे. सरकारच्या हाती काहीही लागले नाही. त्यांचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत, असे फडणवीस यांनी सांगितले.