५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला हडपसर, पुणे येथील चि. अर्चित ओंकार गोरे (वय ३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. अर्चित ओंकार गोरे हा या पिढीतील एक आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

फाल्गुन शुक्ल पक्ष एकादशी (१४.३.२०२२) या दिवशी चि. अर्चित गोरे याचा तिसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे आई-वडील आणि आजी-आजोबा यांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

(‘अर्चित’ या नावाचा अर्थ – सर्वांकडून पूजिला जाणारा. ‘विष्णुसहस्रनाम’ स्तोत्रात श्रीविष्णूचे एक नाव ‘अर्चित’ असेही आहे.)

चि. अर्चित गोरे

चि. अर्चित ओंकार गोरे याला तिसर्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

श्री. ओंकार गोरे

१. जन्मापूर्वी

१ अ. वर्ष २०१८ मध्ये मला सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांचा संतसन्मान सोहळा ‘ऑनलाईन’ पहायला मिळाला. तो पहातांना मी गर्भातील बाळाला ‘हे तुझे गुरुबंधू आहेत’, असे नकळत म्हणाले.

१ आ. सेवा मिळाल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होणे : नवरात्र आणि दत्तजयंती या कालावधीत आम्हाला (मला आणि यजमान यांना) सनातन संस्थेच्या प्रदर्शन कक्षावर सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले या जिवाकडून सेवा करवून घेत आहेत’, अशी माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होती.

१ इ. प्रतिदिन विविध स्तोत्रे म्हणणे आणि अग्निहोत्राचा धूर हवाहवासा वाटणे : मी प्रतिदिन ‘प्रज्ञाविवर्धन स्तोत्र’ १२ वेळा, ‘गणपतिस्तोत्र’, ‘श्रीरामरक्षा आणि मारुतिस्तोत्र’ म्हणत असे. मी प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकत असे. ‘श्रीमन्नारायण नारायण हरि हरि’ ही नामधून ऐकतांना माझी भावजागृती होत असे. त्या वेळी घरात होणार्‍या अग्निहोत्राचा धूर मला हवाहवासा वाटत असे.

१ ई. चि. अर्चितच्या जन्मापूर्वी गुरुकृपेने पुण्यातील नामवंत वैद्य प्रशांत सुरु यांचे मार्गदर्शन आणि उपचार यांचा लाभ होणे

१ ई १. वैद्य प्रशांत सुरु यांनी ‘एकनाथी भागवत’ हा ग्रंथ वाचायला देणे आणि मूल सात्त्विक होणार असल्याचे सांगणे : वैद्य प्रशांत सुरु त्यांच्याकडे उपचार घेणार्‍यांना ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाचे वाचन करायला सांगतात. त्यांनी मला ‘एकनाथी भागवत’ हा ग्रंथ वाचायला दिला. मला सातवा मास असतांना त्यांनी मला सांगितले, ‘‘पोटातील बाळ सात्त्विक असून तुमच्या कुटुंबाला प्रेमाने बांधून ठेवेल.’’ त्यांनी ‘तुमच्या गुरूंची तुमच्यावर कृपा आहे’, असे सांगताच मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

१ ई २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने वैद्यांनी एकनाथी भागवत वाचायला सांगणे : माझ्या यजमानांनी वैद्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याविषयी माहिती दिली. त्यानंतर त्यांनी सांगितले, ‘‘३० वर्षांच्या वैद्यकीय व्यवसायात मी कुणालाही एकनाथी भागवत वाचायला सांगितले नाही; परंतु तुम्हाला पाहिल्यावर ते वाचायला सांगितले.’’

१ ई ३. एकनाथी भागवत वाचल्यावर ‘श्रीविष्णु’, म्हणजेच ‘परात्पर गुरु डॉक्टर’ बाळाची काळजी घेणार असल्याचे वाटणे : मी एकनाथी भागवत वाचायला घेतल्यावर त्यात श्रीविष्णूची स्तुती असल्याचे माझ्या लक्षात आले. ‘श्रीविष्णु म्हणजेच परात्पर गुरु डॉक्टर !’, असा विचार येऊन माझी पुष्कळ भावजागृती झाली. तेव्हा ‘सर्व काही विधीलिखित असून परात्पर गुरु डॉक्टरच बाळाची काळजी घेणार आहेत’, असे मला वाटले.

सौ. सई गोरे

२. जन्म

अ. आधुनिक वैद्यांनी ‘शस्त्रकर्म करावे लागेल’, असे सांगितल्याने आम्ही शस्त्रकर्म करण्यासाठी चांगला दिवस निवडला होता; पण काही कारणामुळे बाळाचा जन्म १५ दिवस आधीच ‘आमलकी एकादशी’ या दिवशी सकाळी ९.१५ वाजता शस्त्रकर्म करून झाला. तेव्हा बाळानेच त्याच्या जन्मासाठी योग्य दिवस निवडला’, असे मला वाटले.’

– सौ. सई ओंकार गोरे (अर्चितची आई), पुणे

आ. ‘अर्चितचा जन्म होत असतांना रुग्णालयाच्या बाहेर एक गाय हंबरली आणि त्याच वेळी एका घरातून शंखनाद ऐकू आला.

३. जन्मानंतर

३ अ. जन्म ते १ वर्ष

३ अ १. अर्चितच्या अंगावर सतत दैवी कण दिसायचे.’

– सौ. मनीषा पाटील (आजी, आईची आई), ऐरोली, नवी मुंबई.

३ अ २. श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून तो शांत होणे : ‘बहिणीला (सौ. सई गोरे हिला) मुलगा होऊन केवळ १० – १५ दिवस झाले होते. तेव्हा तो फार रडत असे. मी संध्याकाळी कार्यालयातून आल्यावर त्याला मांडीवर घ्यायचो. तेव्हा माझ्या शरिरावर आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी लावलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून तो शांत होत असे.’ – श्री. स्वप्नील सुधाकर पाटील, (अर्चितचा मामा)

३ अ ३. अर्चित पहिल्यांदा उभा राहिल्यावर भावावस्थेत असल्याचे जाणवणे : ‘२४.८.२०१९ या दिवशी (गोकुळाष्टमीच्या दिवशी), अर्चित ५ मासांचा असतांना रात्री ८.४५ वाजता काही क्षण उभा राहिला. तेव्हा तो भावावस्थेत असल्याचे मला जाणवले.’ – सौ. सई ओंकार गोरे

३ अ ४. दिव्याच्या ज्योतीकडे पहायला आवडणे : ‘त्याला दिव्याच्या ज्योतीकडे पहायला आवडत असे. त्याचे रडणे थांबत नसतांना त्याला तेवणारा दिवा दाखवल्यावर तो लगेच शांत होत असे.’ – सौ. मनीषा पाटील

३ अ ५. गालावर दोन ॐ उमटणे : ‘१८.१.२०२० या दिवशी रात्री अर्चितच्या डाव्या गालावर २ ॐ उमटलेले दिसले. त्याच्या गालावर अजूनही ते तसेच आहेत.

३ अ ६. अर्चित हसतमुख असून त्याच्याकडे पाहिल्यावर आनंद जाणवतो.’

– श्री. ओंकार गोरे (अर्चितचे वडील), पुणे

सौ. शीतल गोरे

३ आ. वय १ ते ३ वर्षे

३ आ १. व्यवस्थितपणा : ‘अर्चित घेतलेली वस्तू जागच्या जागी ठेवतो. तो कचरा कचर्‍याच्या डब्यातच टाकतो.

३ आ २. ऐकण्याची वृत्ती : तो अयोग्य कृती करत असतांना ‘ही कृती देवाला आणि परात्पर गुरु डॉक्टरांना आवडणार नाही’, असे सांगितल्यावर तो ती कृती थांबवतो.’

– सौ. शीतल शरद गोरे (आजी, वडिलांची आई) आणि श्री. शरद गोरे (आजोबा, वडिलांचे वडील)

३ आ ३. जिज्ञासू वृत्ती : ‘अर्चितने कोणताही नवीन शब्द ऐकल्यावर तो त्या शब्दाचा अर्थ विचारतो आणि लक्षात ठेवतो. एकदा मी भाषांतराची सेवा करत असतांना त्याने मला विचारले, ‘‘तुम्ही काय करता ?’’ मी त्याला सांगितले, ‘‘सेवा करत आहे.’’ तेव्हा लगेच त्याने ‘सेवा म्हणजे काय ?’, हे जाणून घेतले. त्यानंतर मी संगणकावर काही करतांना दिसलो की, तो म्हणतो, ‘बाबा सेवा करत आहेत.’ – श्री. ओंकार गोरे, पुणे

३ आ ४. चांगली निरीक्षणक्षमता

अ. ‘अर्चितची निरीक्षणक्षमता चांगली आहे. त्याने एखादी कृती बघितली, तर तो त्यानुसार करण्याचा प्रयत्न करतो, तसेच एखादा शब्द जसाच्या तसा उच्चारतो. ‘त्याला सर्व शब्दांचा अर्थ कळत नसला, तरी संदर्भ समजतो’, असे वाटते.

आ. अर्चितला एकदा एखादी गोष्ट सांगितली की, ती त्याच्या लक्षात रहाते. एकदा माझे बाबा घरी नसतांना मी देवपूजा करत होतो. मी शंख चुकून डावीकडे ठेवला. तेव्हा अर्चित मला म्हणाला, ‘‘बाबा, इकडे नाही, उजवीकडे ठेवायचा.’’

– श्री. ओंकार गोरे, पुणे

श्री. शरद गोरे

३ आ ५. चांगली स्मरणशक्ती : ‘अर्चित २ वर्षांचा असतांना त्याला ‘ये रे, ये रे पावसा’ हे बालगीत एकदाच म्हणून दाखवले. त्याचे ते लगेच मुखोद्गत झाले.’ – श्री. शरद गोरे (अर्चितचे आजोबा (वडिलांचे वडील))

३ आ ६. साहाय्य करणे : ‘त्याला सगळ्यांना साहाय्य करायला आवडते. अर्चित मला कपडे वाळत घालायला नेहमी साहाय्य करतो.

३ आ ७. सेवा करायला आवडणे : वर्ष २०२१ मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण मिळवण्याची सेवा करतांना तो आमच्या समवेत येत असे. त्या वेळी त्याला ‘कुठे चाललास ?’, असे विचारल्यावर ‘गुरुपौर्णिमेच्या सेवेला जात आहे’, असे तो सांगत असे.

३ आ ८. प्रेमळ : घरात कुणी रुग्णाईत असेल, तर अर्चित प्रेमाने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवून पापी घेतो आणि ‘बरं झालं, बरं झालं’, असे म्हणतो.’

– सौ. सई ओंकार गोरे

३ आ ९. चुकांविषयी संवेदनशीलता

अ. अर्चितला त्याच्या चुकीची जाणीव करून दिल्यावर त्याला चूक समजते. त्याला ‘तुझी काय चूक झाली ?’, असे विचारल्यावर तो ती चूक व्यवस्थित सांगतो आणि चुकीबद्दल क्षमाही मागतो.

आ. अर्चितला चुकीची जाणीव करून दिल्यावर त्याने सहजतेने डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांची क्षमा मागणे : ‘अर्चित दीड वर्षांचा असतांना एकदा आम्ही (मी, यजमान आणि अर्चित) सौ. कुंदाताई (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पत्नी डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले) यांना भेटण्यासाठी मुंबई येथे गेलो होतो. तेव्हा आम्ही बोलत असतांना अर्चित गादीवर उड्या मारत होता. खेळतांना त्याचा पाय चुकून डॉ. (सौ.) कुंदाताईंना लागल्यावर आम्ही त्याला म्हणालो, ‘‘अर्चित, आपली आजी आहे ना ? त्यांना तुझा पाय लागला.’’ त्यानंतर त्याने स्वयंप्रेरणेने त्यांच्या पायाची पापी घेतली आणि त्यांची कान धरून क्षमा मागितली.

३ आ १०. सात्त्विकतेची आवड असणे

अ. ‘अर्चितचे आजोबा (वडिलांचे वडील) प्रतिदिन अग्निहोत्र करतात. अर्चितला त्यात आहुती द्यायला आवडते. तो मंत्र म्हणण्याचाही प्रयत्न करतो.

आ. ‘गुरुलीला सत्संग’ (पुणे जिल्ह्यातील साधकांसाठी व्यष्टी साधना आणि समष्टी सेवेविषयीचा सत्संग) चालू झाल्यावर त्यातील श्रीकृष्णाचा श्लोक ऐकून तो हात जोडून उभा रहातो. सत्संगाच्या शेवटी कृतज्ञता व्यक्त करतांनाही तो हात जोडतो. तो स्वतःहून या कृती करतो.’

– सौ. सई ओंकार गोरे

इ. ‘तो आमच्या समवेत आवडीने नामजप करतो.’

– श्री. ओंकार गोरे

३ आ ११. परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राला नमस्कार करणे : एकदा रात्री झोपतांना मी अर्चितला विचारले, ‘‘तू परात्पर गुरु डॉक्टरांना नमस्कार केलास का ?’’ तेव्हा त्याने त्वरित उभे राहून परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राला नमस्कार करून झोपला.’

– सौ. सई ओंकार गोरे

४. अर्चितचा स्वभावदोष :

हट्टीपणा

‘परात्पर गुरु डॉक्टर, तुम्हीच आम्हाला प्रसाद म्हणून हे बाळ दिले आहे. त्याबद्दल आम्ही आपल्या चरणी कृतज्ञ आहोत. आपणच बाळाचे खर्‍या अर्थाने आई-वडील आहात. आमचा प्रत्येक विचार आणि कृती केवळ आपल्याला अपेक्षित अशी असू दे. आपल्याला अपेक्षित अशी साधना आपणच आमच्याकडून करवून घ्या’, अशी आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’

– सौ. सई ओंकार गोरे आणि श्री. ओंकार गोरे

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक