६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) शालन राजाराम नरुटे यांच्या वर्षश्राद्धाचे विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडल्याने श्री. शंकर नरुटे यांनी अनुभवलेली देवाची कृपा !

कै. (सौ.) शालन नरुटे
श्री. शंकर नरुटे

१. आईच्या वर्षश्राद्धासाठी शास्त्रानुसार विधी करण्यासाठी सनातन संस्थेच्या पुरोहितांना विचारून घेऊन तसे विधी करणारे पुरोहित शोधण्याचा प्रयत्न करणे

‘मी माझ्या आईच्या (६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) शालन राजाराम नरुटे  यांच्या) वर्षश्राद्धासाठी शास्त्रानुसार विधी करण्याचे ठरवले. मी सनातन संस्थेच्या वेदपाठशाळेतील पुरोहितांशी बोलून ‘कोणते विधी आणि ते कसे करायचे ?’, हे विचारून घेतले. त्यासाठी मी शास्त्रोक्त विधी करणारे पुरोहित शोधत होतो.

२. नेहमी येणार्‍या पुरोहितांनी शास्त्रोक्त विधी करण्यास होकार देणे आणि साधकाने आश्रमात शिकल्याप्रमाणे विधीची पूर्वसिद्धता करणे

आमच्याकडे नेहमी घरी येणार्‍या पुरोहितांना मी शास्त्रोक्त विधी करण्याविषयी विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘सनातन संस्थेप्रमाणे इतके विधी कुणीही करत नाही. लोकांना इतका वेळ नसतो. विधी करून घेणारे श्रद्धाळू असतील, तर करणार्‍यालाही उभारी येते; पण तू म्हणतोस, तर आपण तसे विधी करूया.’’ त्यानुसार मी विधीची सिद्धता केली. मी आश्रमात जसे शिकलो होतो, त्याप्रमाणे सर्व नियोजन केले. आश्रमात विधींच्या वेळी ‘सेवा परिपूर्ण कशी करायची?’, हे शिकल्यामुळे मला घरी पूर्वसिद्धता सहजतेने करता आली. त्यामुळे पुरोहितांचा त्यासाठी वेळ न जाता त्यांना विधी लगेच चालू करता आले. त्यांनी विधी चांगले केले. याविषयी देवाच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

३. दुसर्‍या दिवसापासून दळणवळण बंदी लागू होणे; परंतु देवाच्या कृपेने त्या पूर्वीच विधी झाल्याने नातेवाइकांना विधीसाठी येता येणे

दुसर्‍या दिवसापासून आमच्या गावी दळणवळण बंदी चालू होणार होती; मात्र त्याच्या अगोदरच आईचे वर्षश्राद्ध पार पडले. त्यामुळे सर्व नातेवाइकांना विधीसाठी येता आले आणि त्यांनी विधीही व्यवस्थित झाल्याचे सांगितले. (आईच्या अंत्यविधीच्या वेळीही दळणवळण बंदी होती. तेव्हाही अंत्यसंस्कार व्यवस्थित पार पडले होते.) ही सर्व देवाचीच कृपा होती.

वरील प्रसंगात मला देवाचे अस्तित्व अनुभवता आले आणि ‘कोणतीही परिस्थिती आली, तरी देव कशी काळजी घेतो’, हेही अनुभवता आले. यासाठी मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.४.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक