रशियाच्या बाजूने सीरियातील इसिसचे आतंकवादी लढणार ?
१. रशियाचे सैनिक लढण्यास सिद्ध नसल्याने राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी लढाईसाठी आतंकवाद्यांचे साहाय्य घेणे
‘नुकतीच बातमी आली की, मध्यपूर्वेतील सीरियामधील इसिसचे आतंकवादी युक्रेनमध्ये जाऊन रशियाच्या बाजूने लढायला सिद्ध आहेत. ‘त्यांना घेऊन युद्ध करावे’, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी ठरवले आहे. या लढवय्यांची संख्या १४ ते १५ सहस्र असू शकेल. ते स्वत:हून येत असून भाडोत्री नाहीत. त्यामुळे त्यांना लढण्यासाठी रशियाकडून अनुमती देण्यात येत आहे. ‘त्यांना रशियाच्या बाजूने युद्ध करायचे आहे; म्हणून आम्ही त्यांना बोलावत आहोत’, असा आव पुतिन यांनी आणण्याचा प्रयत्न केला. यामागील सत्य हे आहे की, १८ दिवस उलटून गेले असून रशियाच्या सैन्याची आगेकूच अतिशय मंदावली आहे. रशियाच्या सैन्याने कीवला वेढा घातला; परंतु गेल्या १० दिवसांपासून ते तेथेच अडकलेले आहेत. तेथील इमारतींच्या आत घुसून युक्रेनच्या सैनिकांना मारण्याचे धाडस त्यांच्यात नाही. ते केवळ शस्त्रास्त्रांनी तेथील इमारती उद्ध्वस्त करत आहेत.
(सौजन्य : Brig Hemant Mahajan,YSM)
२. रशियाचे सैनिक अधिक प्रमाणात ठार होऊ नयेत आणि देशांतर्गत होणार्या विरोधामुळे त्याने भाडोत्री सैनिकांचे साहाय्य घेण्याचे ठरवणे
रशियामध्ये काही सैनिक असे असतात की, जे केवळ ३ वर्षांसाठी सैन्यात भरती होतात. त्यांची संख्या रशियाच्या सैन्याच्या ५० ते ६० टक्के एवढी असते. या सैनिकांना भरती झाल्यावर एक वर्षाचे प्रशिक्षण असते. त्यामुळे केवळ २ वर्षे ते सैन्यात चाकरी करतात. परिणामी त्यांचे आई-वडीलही रशियाच्या सामाजिक माध्यमांवर बोलतांना म्हणतात, ‘‘आमच्या तरुण मुलांना तुम्ही सैन्यात का पाठवत आहात ? तुमचे कायमस्वरूपी सैन्य आहे, त्याला तुम्ही या युद्धासाठी का पाठवत नाही ?’’ अशा प्रकारे रशियाच्या राष्ट्राध्यक्षांवर दबाव आहे. त्यामुळे रशियाचे सैनिक अधिक प्रमाणात ठार होऊ नये, असे त्यांना वाटते. युक्रेनच्या गनिमी काव्यामुळे रशियाचे सैनिक मोठ्या प्रमाणात मारले जात आहेत. युक्रेनच्या म्हणण्याप्रमाणे रशियाच्या मृत्यू झालेल्या सैनिकांची संख्या काही सहस्र असावी. नेमकी आकडेवारी आपल्याला कळू शकत नाही. एवढे निश्चित आहे की, युद्धभूमीवर रशियाच्या सैन्याचे रक्त सांडले जात आहे आणि त्यासाठी त्यांचे सैनिक सिद्ध नाहीत. अशा परिस्थितीत सीरियामधून आतंकवाद्यांना आणण्याचा प्रयत्न होत आहे. रशियातील काही खासगी सुरक्षा संस्था आहेत, ज्यांना ‘वॅगनार ग्रुप’ म्हटले जाते. यामध्ये निवृत्त सैनिक काम करतात, त्यांनाही या युद्धात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न चालू आहे. थोडक्यात रशियाचे सैन्य लढायला सिद्ध नाही आणि ते ‘लढाईचे काम हे भाडोत्री सैनिकांना द्या’, असे म्हणत आहेत.
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे
रशिया हा चीनचा सर्वांत मोठा मित्र असल्यामुळे भारतालाही पुढील काळात कुणावरही अवलंबून न रहाता स्वत:च्या सामर्थ्याने लढावे लागेल. त्यासाठी भारताने स्वत:ची सैन्यक्षमता आणि युद्ध सामुग्रीचे आधुनिकीकरण यांवर भर द्यायला पाहिजे ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे |