त्यागी वृत्ती, कुटुंबासाठी सतत झटणार्या आणि जीवनातील कठीण प्रसंगांना हसतमुखाने सामोर्या जाणार्या डिचोली, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुनंदा सामंत (वय ८४ वर्षे) !
१. सौ. गीता बांदेकर (मधली बहीण), मुलुंड, मुंबई.
१ अ. कठीण परिस्थितीत घर सावरणे : ‘अक्काचे (श्रीमती सुनंदा सामंत यांचे) कौतुक करावे, तितके थोडे आहे. त्या काळी आमची आर्थिक स्थिती बेताची आणि मोठे कुटुंब (३ भाऊ आणि ४ बहिणी) होते. अक्काने आमच्यासाठी पुष्कळ केले. ते शब्दांत सांगता येणार नाही.
१ आ. घरासाठी अनेक प्रकारच्या तडजोडी करणे : आमच्या घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे आम्हा सर्वांना निदान पोटभर जेवायला मिळावे, यासाठी अक्काने खानापूर येथील पाद्र्यांच्या शाळेत नोकरी पत्करली. शाळेच्या व्यवस्थापनाने अक्काला ‘प्रतिमास ७० रुपये देणार’, असे सांगितले होते; मात्र प्रत्यक्षात त्यांनी ‘सत्तर रुपये मिळाले’, अशी सही घेऊन तिच्या हातावर केवळ ४० रुपये ठेवले. तेव्हा ती म्हणाली, ‘‘चाळीस रुपये तरी थोडे आहेत का ?’’ आमचे घर सावरण्यासाठी तिला बरीच धडपड करावी लागली. तिने ती कोणतीही अपेक्षा न ठेवता निःस्वार्थीपणाने केली.
१ इ. भावंडांच्या आनंदात समाधान मानणे : मी आणि दादा शिक्षणासाठी खानापूरला होतो. एकदा काहीतरी कामानिमित्त अक्का खानापूरला आली होती. तेव्हा तिने मला निरोप पाठवला, ‘‘मला बसस्थानकावर भेटायला ये.’’ मी धावतच तेथे गेले. आमचे बोलणे झाल्यावर तिने रुमालाची गाठ सोडून मला २ रुपये दिले. (त्या काळी अक्काला अनुमाने १०० ते १५० रुपये वेतन असेल. त्या वेळच्या २ रुपयांचे मूल्य आजच्या २००-२५० रुपयांच्या एवढे होते.) मी ते पैसे घेतल्यावर माझ्या तोंडवळ्यावरील आनंद पाहून तिला समाधान वाटले. माझ्या मनात आजही ती स्मृती ताजी आहे.’
२. श्रीमती पद्मजा सडेकर (धाकटी बहीण), डोंबिवली, ठाणे.
२ अ. अत्यंत कष्टाने स्वतःचे शिक्षण पूर्ण करणे : ‘तिने अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण घेतले. ती सकाळी ६ वाजता घर सोडायची आणि कधी संध्याकाळी, तर कधी रात्री घरी परतायची. तिला भूक लागल्यावर ती केवळ एक कप चहा प्यायची. तिने घराला हातभार लावण्यासाठी पुष्कळ धडपड केली. भावाचे शिक्षण व्हावे, यासाठी तिने स्वतः ‘मॅट्रिक’ची परीक्षा न देता ते पैसे भावाचे शुल्क भरण्यासाठी वापरले. त्यानंतर तिने पुढे स्वतःचे शिक्षण पूर्ण केले.
२ आ. घरातील व्यक्तींना सण साजरा करता यावा, यासाठी पैसे पाठवणे : अक्का घरच्यांसाठी केवळ कर्तव्यबुद्धीने करत नसे, तर त्यामागे तिचे प्रेम असे. एकदा अक्का नंदगडला (जिल्हा बेळगाव) शिक्षिका म्हणून नोकरी करत असतांना तिने एका व्यक्तीच्या हस्ते नागपंचमीच्या सणाच्या व्ययासाठी काही पैसे घरी पाठवले. दुसरे कोणी असते, तर त्यांनी विचार केला असता, ‘पैसे पाठवले आहेत. माझे काम झाले. ते सण साजरा करतील’; मात्र अक्काने विचार केला, ‘मी पाठवलेले पैसे त्यांना मिळाले असतील ना ? माझी भावंडे सण साजरा करू शकतील ना ?’ त्यानंतर अक्का तिच्या एका मैत्रिणीसह धो धो पावसात नंदगड ते खानापूर हे ११ कि.मी. अंतर चालत आली. त्या वेळी वाटेतील लहान पुलावर पाणी भरले होते, तरी जिवावर उदार होऊन त्या दोघी पुलावरून घरी आल्या. तिने घरात पाय ठेवताच आईला विचारले, ‘‘मी पाठवलेले पैसे मिळाले का ?’’
२ इ. प्रत्येक वाढदिवसाला भेटवस्तू पाठवणे : अक्का माझ्या प्रत्येक वाढदिवसाला न चुकता मला भेटवस्तू पाठवायची. मी वही, रंगपेटी असे काहीही मागितले, तर ती हसतमुखाने माझ्या हातात ठेवायची. मला अनेक वेळा तिच्याकडे मागावेही लागत नसे. ती आम्हाला कायम सांगायची, ‘‘मी तुमच्यापेक्षा अधिक पावसाळे पाहिले आहेत. तुमच्या तोंडवळ्यावरील भावांवरून मला ‘तुमच्या मनात काय चालले आहे ?’, हे ओळखता येते.
२ ई. आजारपणात सर्वतोपरी साहाय्य करणे : तिचे वय लक्षात घेऊन आणि तिला ताण यायला नको; म्हणून ‘मला कर्करोग झाला आहे’, हे आरंभी आम्ही तिला सांगितले नव्हते. अक्काला याविषयी समजल्यावर तिने मला पुष्कळ मानसिक आधार दिला. तिने मला आर्थिक साहाय्यही केले.’
३. सौ. अदिती सामंत (सून), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३ अ. कौटुंबिक चालीरीतींविषयी प्रेमाने समजावून सांगणे : ‘मी मूळची सासवड, पुणे येथील आहे. वर्ष २००० मध्ये माझा श्री. अनिल सामंत यांच्याशी विवाह झाला आणि मी डिचोली, गोवा येथील घरात रहायला आले. तेथे माझ्या सासूबाई, यजमान आणि मी असे तिघेच रहात असू. आमचे मूळ घर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळजवळ आहे. आम्ही तिथे प्रत्येक वर्षी गणेशचतुर्थीला जातो. त्या वेळी सामंत कुटुंबातील नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत रहाणारे अन्य सदस्यही येतात. मला सर्वांशी जुळवून घ्यायला सोपे जावे; म्हणून सासूबाईंनी मला आधीच तेथील चालीरीतींविषयी प्रेमाने समजावून सांगितले. त्यामुळे मला तिथे काहीच अडचण आली नाही.
३ आ. सतत कार्यरत असणे : मी त्यांना कधीही आळस करतांना पाहिले नाही. त्या दिवसभरातील कामे ठरलेल्या वेळेतच पूर्ण करतात.
३ इ. प्रेमभाव : त्या प्रत्येक सणाला प्रत्येकाला काहीतरी भेटवस्तू देतात. इतरांना भरभरून देणे, हे त्यांना मनापासून आवडते. आई घरात येणार्या प्रत्येक व्यक्तीला चहा आणि काहीतरी खायला देतात. आमच्या घरी शेजारच्या घरातील व्यक्ती आली, तरी त्या तिला चहा-कॉफी देतात.
४. श्री. मुकुल दुर्गेश सामंत (नातू), सांगली, महाराष्ट्र.
४ अ. नित्यनेमाने आणि सहजतेने ठरलेल्या कृती करणे : ‘आजी प्रतिदिन पहाटे लवकर उठणे, घरातील केर काढणे, झाडांना पाणी घालणे इत्यादी घरातील कामे वर्षानुवर्षे नित्यनेमाने आणि आनंदाने करते.
४ आ. धार्मिक पोथ्यांचे श्रद्धेने वाचन करणे : मी लहान असल्यापासून ‘आजी त्याच पोथ्या प्रतिदिन वाचते’, असे पाहिले आहे. ती पोथी वाचन आरंभ करण्यापूर्वी, तसेच वाचून झाल्यावर प्रत्येक पोथीला भावपूर्ण नमस्कार करते. ती प्रकृती ठीक नसतांनाही पोथ्यांचे वाचन करते.
४ इ. जवळीक साधणे : आजी घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी मोकळेपणाने बोलते. ती घरी प्रथमच आलेल्या अनोळखी व्यक्तीशीही बोलते.
४ ई. वय झाले, तरी गोडवा टिकून असणे : आजीचे वय ८० वर्षांहून अधिक आहे. तिच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले. तिच्या जीवनात आजही अनेक अडचणी आहेत; परंतु यांमुळे तिच्यात कटूता आलेली नाही. तिच्यातील गोडवा आजही टिकून आहे. ‘तिचे वय जसे वाढत आहे, तसा तिच्यातील गोडवा अल्प न होता वाढत आहे’, असे मला जाणवते.’
५. श्रीमती अंजली सामंत (धाकटी जाऊ), गोरेगाव, मुंबई.
५ अ. सोशिक : माई (श्रीमती सुनंदा सामंत) पुष्कळ सोशिक आहे. तिला तिची सासू किंवा यजमान कितीही बोलले, तरी ती काहीही प्रत्युत्तर न देता खाली मान घालून शांत रहायची. तिच्यापेक्षा वयाने पुष्कळ लहान असलेली व्यक्ती तिला काही बोलली, तरी ती हसून उत्तर द्यायची. ‘तुला काही वाटत नाही का ?’, असे विचारले, तर ती ‘चालायचेच’, असे उत्तर देऊन विषय सोडून द्यायची.
६. श्री. सुनील सामंत (पुतण्या), कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.
६ अ. देण्याची वृत्ती : ‘माई गोव्याला रहाते. ती गणेशचतुर्थी, दिवाळी, नाताळ, मे मासाची सुटी, अशा शाळांच्या सुट्यांमध्ये आमच्याकडे यायची. आम्ही लहानपणी तिची आतुरतेने वाट पहायचो; कारण ती आम्हाला प्रेमाने काहीतरी खाऊ किंवा वैशिष्ट्यपूर्ण भेटवस्तू घेऊन यायची. तिच्यामुळे आम्ही पुष्कळ चांगल्या गोष्टी शिकलो.
६ आ. माई एक चांगली आई आणि शिक्षिका आहे.
७. सौ. सीमा खानोलकर (मधल्या नणंदेची सून), गोरेगाव, मुंबई.
७ अ. पराकोटीची सहनशीलता असणे : ‘एकदा मामी (श्रीमती सुनंदा सामंत) आमच्या घरी गोरेगावला आल्या होत्या. आम्ही सर्वजण गप्पा मारत होतो. त्या वेळी मामी गप्पा मारत विळीवर खोबरे खोवत होत्या. तेव्हा मामीच्या हातांतून अकस्मात् नारळाची वाटी सुटून त्यांचा हात जोरात विळीवर आपटला. त्यामुळे त्यांच्या हाताला खोल जखम झाली. मी लगेच त्यांना आधुनिक वैद्यांकडे घेऊन गेले. त्यांनी मामींना भूल न देताच त्यांची जखम धुऊन टाके घातले. त्या वेळी ‘मामींना किती वेदना होत असतील’, या विचाराने माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले; परंतु मामींच्या तोंडवळ्यावर वेदना किंवा दुःख यांचा लवलेशही नव्हता. त्यांचा तोंडवळा नेहमीप्रमाणेच शांत आणि हसरा होता. मी त्यांना विचारले, ‘‘दुखतंय ना ?’’ तेव्हा त्या हसून म्हणाल्या, ‘‘थोडे दुखत आहे; पण सहज सहन करू शकते.’’
८. सौ. दर्शना सामंत (मोठ्या नणंदेची सून), विरार, मुंबई.
(श्रीमती सुनंदा सामंत यांचा १९.६.२०२१ या दिवशी वाढदिवस होता. त्यानिमित्त केलेले काव्य)
सोशिक अन् प्रेमळ मामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा ।
शिक्षिका ही फारच छान ।
गावातही मोठा मान ।। १ ।।
घरी येणारे-जाणारे नेहमीच सारे ।
स्मितहास्याने करी स्वागत न्यारे ।। २ ।।
छोट्यांचे लाड, मोठ्यांचा मान ।
नेहमीच करी पाहुणचार छान ।। ३ ।।
अशा सोशिक अन् प्रेमळ मामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा ।
तिला ‘उदंड आयुष्य लाभो’, हीच इच्छा ।। ४ ।।
(१.६.२०२१)