श्री महालक्ष्मी मंदिर आणि श्री जोतिबा देवस्थान येथील मंदिर प्रवेशासाठी ‘ई-पास’ची सक्ती रहित !

भाविक, ग्रामस्थ, पुजारी यांच्या आंदोलनास यश !

श्री महालक्ष्मी मंदिरात प्रवेश करतांना भाविकगण

कोल्हापूर, १२ मार्च (वार्ता.) – श्री जोतिबा देवस्थान येथील मंदिरातील चारही द्वारे उघडून ‘ई-पास’ सुविधा बंद करावी, या मागणीसाठी जोतिबा डोंगर येथे ११ मार्चपासून धरणे आंदोलन चालू करण्यात आले होते. येथील दुकानदारांनी पूर्णत: व्यवहार बंद ठेवून तसेच विविध संघटना, पक्ष यांनी भेटून या आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला होता. १२ मार्च या दिवशी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही पाठिंबा घोषित केला होता. अखेर आंदोलनास यश येऊन १२ मार्च या दिवशी रात्री ९.३० पासून श्री महालक्ष्मी मंदिर आणि श्री जोतिबा देवस्थान येथील मंदिर प्रवेशासाठी ‘ई-पास’ची सक्ती रहित केल्याचा निर्णय प्रशासनाने घोषित केला.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने प्रसिद्धीस दिलेले पत्र

रात्री ९.३० वाजता कोल्हापूर येथे ‘श्री अंबामाता की जय ।’, ‘श्री महालक्ष्मीदेवीचा विजय असो ।’, अशा घोषणांमध्ये भाविकांनी श्री महालक्ष्मी मंदिरात प्रवेश केला. १३ मार्च या दिवशी जोतिबा देवस्थान येथे ४ था खेटा असून या निर्णयामुळे भाविकांना मुक्तपणे प्रवेश मिळणार आहे. या निर्णयामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. या संदर्भात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव श्री. शिवराज नाईकवाडे यांनी प्रसिद्धीपत्रक दिले असून ७ ऑक्टोबर २०२१ पासून चालू करण्यात आलेली ‘ई-पास’ सेवा स्थगित करत असल्याचे घोषित केले आहे.