हिंदु धर्मामध्‍ये राहूनच लिंगायत समाजाने सवलती मिळवाव्‍यात !

श्रीशैल्‍य जगद्गुरु चन्‍नसिद्धराम पंडिताराध्‍य शिवाचार्य यांचे प्रतिपादन

श्रीशैल्‍य जगद्गुरु चन्‍नसिद्धराम पंडिताराध्‍य शिवाचार्य

सोलापूर – वीरशैव लिंगायत समाज हे हिंदु धर्माचे अविभाज्‍य अंग आहे. हा समाज हिंदु धर्माहून वेगळा नाही. वीरशैव लिंगायत समाजातील घटकांसाठी सोयी सवलतींसाठीचे प्रयत्न हे हिंदु धर्माच्‍या कक्षेत राहूनच करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्रीशैल्‍य जगद्‍गुरु डॉ. चन्‍नसिद्धराम पंडिताराध्‍य शिवाचार्य यांनी केले. कर्नाटकातील विजयपूर येथे हिंदु वीरशैव लिंगायत मंचच्‍या पदाधिकार्‍यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर जगद्गुरूंनी ही भूमिका मांडली.

या बैठकीला श्री रेणुक शिवाचार्य मंद्रूपकर, ‘हिंदु वीरशैव लिंगायत मंच’चे प्रांत पालक हेमंतराव हरहरे, पश्चिम महाराष्‍ट्र प्रांत संयोजक शरद गंजीवाले, सोलापूर जिल्‍हा संयोजक गजानन धरणे, श्री सिद्धेश्वर आणि मल्लिकार्जुन मंदिराचे पुजारी मनोज हिरेहब्बू, सोलापूर शहर संयोजक चिदानंद मुस्‍तारे, गुरुनाथ चरंतिमठ, आण्‍णाराय बिरादार, नितीन बिरादार आदी उपस्थित होते.

जगद्‍गुरु डॉ. चन्‍नसिद्धराम पंडिताराध्‍य शिवाचार्य म्‍हणाले की,

१.अलीकडच्‍या काळात काही लोक लिंगायत धर्म वेगळा आणि स्‍वतंत्र असल्‍याचे सांगत आहेत; परंतु ते खरे नाही. लिंगायत आणि वीरशैव हे वेगवेगळे नाहीत. एकाच समाजाची ती २ नावे आहेत.

२.भारत हा धर्मप्रधान देश आहे. येथे अनेक संप्रदाय, समुदाय आहेत. एकच तत्त्व अनेक रूपांतून व्‍यक्त होते आणि अनेक रूपांत एकच तत्त्व विराजमान आहे, हा विचार भारताची विशेषता आहे. वीरशैव लिंगायत समाज भारतातील एक प्रमुख आचारधर्म आहे.

३.आम्‍ही शिवाची उपासना करतो, विभूती धारण करतो. कुंकू, रूद्राक्ष धारण करतो. हे सर्व हिंदु धर्माचेच आचार आहेत. लिंगायत धर्माची स्‍थापना बसवेश्वरांनी केल्‍याचे सांगणेही चुकीचे आहे; कारण बसवेश्वरांनी लिहिलेल्‍या एकाही वचनात लिंगायत शब्‍द नाही. वीरशैव शब्‍द त्‍यांच्‍या वचनांत अनेक ठिकाणी आला आहे. याचाच अर्थ वीरशैव आणि लिंगायत वेगवेगळे नाहीत. त्‍याचे संस्‍थापकही वेगवेगळे नाहीत.