सातारा येथे यावर्षी भरणार ‘महाराष्ट्र केसरी’चा आखाडा !


सातारा, १३ मार्च (वार्ता.) – कुस्ती क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणार्‍या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे यजमानपद या वर्षी सातारा जिल्ह्याला मिळाले आहे. सातारा जिल्ह्याला कुस्तीची मोठी परंपरा असून ऑलंपिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून देणारे ऑलंपिकवीर खशाबा जाधव यांच्यामुळे सातारा जिल्ह्याचे कुस्तीमधील महत्त्व अधोरेखित होते.

४ ते ९ एप्रिल २०२२ या कालावधित शहरातील शाहू क्रीडा संकूल येथे या कुस्त्या पार पडणार असून महाराष्ट्रातील मातब्बर कुस्तीपट्टू यात सहभागी होणार आहेत. राज्य कुस्तीगीर कार्यकार्यकारिणीच्या मोहोळ येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ६४ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत वरिष्ठ गट, गादी गट आणि माती गटातील अजिंक्यपदासाठी लढती होणार आहे, तर राष्ट्रीय स्तरावरील ‘ज्युनिअर’ आणि ‘सबज्युनिअर’ स्पर्धा १८ ते २० एप्रिल या कालावधित पुणे येथील भोसरी आणि पिंपरी चिंचवड येथे होणार आहेत.