दादर (मुंबई) येथील सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सौ. सोनिया अतुल परचुरे यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील वास्तव्याच्या कालावधीत जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
३ ते ५.१.२०२२ या कालावधीत दादर (मुंबई) येथील सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सौ. सोनिया अतुल परचुरे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास होत्या. या कालावधीत त्यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
प्रति, सौ. सोनिया अतुल परचुरे, दादर, मुंबई. सप्रेम नमस्कार. आपण सनातन आश्रमाला भेट दिल्यानंतर आपल्याला जाणवलेली सूत्रे अत्यंत अत्यंत सुंदर शब्दांत आणि तत्परतेने पाठवलीत, एवढेच नव्हे, तर त्या सूत्रांचे ध्वनीमुद्रण करून पाठवलेत, याबद्दल प्रथम आपले आभार मानतो. आपले ध्वनीमुद्रण ऐकताना ते किती मनापासून, अगदी हृदयातून आले आहे, हे जाणवत होते आणि ‘ऐकतच रहावे’, असे वाटत होते. आपली बोलण्याची पद्धत, विषय मांडण्याची पद्धत, अतिशय चपखल अशी उदाहरणे आणि आपला आवाज हे सर्वच फारच छान ! किंबहुना आपल्या कलासाधनेचा आणि बुद्धीमत्तेचा तो एक लहानसा आविष्कार आहे, असे म्हटले, तर ते अधिक सयुक्तिक ठरेल. आपल्या एवढ्या अल्प कालावधीतील आश्रमातील वास्तव्यात केवळ साधकांचेच नाही, तर आश्रमाची वास्तू आणि येथील वातावरण यांचेही आपण एवढ्या बारकाईने निरीक्षण केलेत अन् ते ओघवत्या शैलीत मांडलेत, हे निव्वळ कौतुकास्पद आहे. सहसा बाहेरील कलावंत जेव्हा आश्रमात येतात, तेव्हा येथील शांतता, स्वच्छता इत्यादी स्थुलातील गोष्टी ते अनुभवतात; पण आपण आश्रम आध्यात्मिक स्तरावर अनुभवलात; देवतांची चित्रे, मूर्ती; संतांची छायाचित्रे यांच्या दर्शनातून आपल्याला आध्यात्मिक अनुभूती आल्या, हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपण जे अनुभवले ते मनमोकळेपणाने सांगणे आणि इतरांची अंतःकरणापासून प्रशंसा करणे, याला फार मोठे मन लागते. अशा व्यक्तीशी भगवंताने आमची भेट घडवून आणली, हे आमचे भाग्यच होय. ‘आपण पुन्हा आश्रमात यावे आणि आपल्या प्रदीर्घ नृत्यानुभवाचा अन् नृत्यसाधनेचा अखिल मानवजातीला लाभ करून देणार्या संशोधनात सहभागी व्हावे’, अशी मी आपणास पुन्हा एकवार विनंती करतो. आपल्या भावी इच्छित कार्यास आमच्या अनेकानेक शुभेच्छा ! ईश्वराच्या कृपेने आपले ऋणानुबंध जुळले. ‘ते उत्तरोत्तर अधिकाधिक दृढ व्हावेत’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! कळावे. आजच तालयोगी श्री. सुरेश तळवलकरगुरुजी यांच्याशी दूरभाषवर बोलणे झाले. त्यांचेही विचार आपल्यासारखेच आहेत. ते आश्रमात येणार आहेत आणि लिखाण अन् संशोधन यांत साहाय्य करणार आहेत. त्यांचा संपर्क करून दिल्याबद्दल कृतज्ञ आहे. – डॉ. जयंत आठवले |
१. बालमैत्रीण सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे हिने साधनेसाठी कायमस्वरूपी सनातनच्या आश्रमात जाण्याचा निर्णय घेतल्यावर तिच्या निर्णयाचा आदर करणे
साधारणपणे वर्ष १९९८ मध्ये माझी बालमैत्रीण सुश्री (कु.) सुप्रिया शरद नवरंगे हिने मला सांगितले, ‘‘सनातन संस्था’ नावाचा एक विचारप्रवाह मला पटतो आणि मी ‘त्यातच रमायचे आहे’, असे ठरवले आहे. मला नामस्मरणाचे महत्त्व कळले आहे. त्यामुळे मी साधना करणार आहे. त्यासाठी मी हे व्यवहाराचे ओझे सोडून कायमस्वरूपी आश्रमात चालले आहे.’’ हे ऐकल्यावर माझ्यासारख्या सरधोपट मार्ग स्वीकारलेल्या (सरळमार्गी) जिवाला यातील काहीही कळणे अशक्य होते; परंतु ‘जगा आणि जगू द्या’, या माझ्या वडिलांच्या शिकवणीमुळे मी तिच्या या निर्णयाचा आदर केला. मला असे करायला नेहमीच जमले आहे अन् त्याविषयी आज मला अतीव समाधान वाटते.
२. दोन वेळा रामनाथी आश्रमापाशी येऊनही संपूर्ण आश्रम पहाण्याचा योग न येणे; मात्र ३.१.२०२२ या दिवशी खर्या अर्थाने आश्रमदर्शनाचा योग येणे आणि तेव्हापासून ‘आश्रमयोग’ चालू होणे
माझा २ वेळा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमापाशी येण्याचा योग आला. एकदा मी आश्रमाच्या स्वागतकक्षापर्यंत आले आणि आश्रमाचा काही भाग बघून गेले; मात्र कुतूहलापलीकडे त्या विषयाचे मंथन झाले नाही. खर्या अर्थाने माझा आश्रमदर्शनाचा योग ३.१.२०२२ या दिवशी आला. त्यानंतर जे सर्व घडून आले, त्याला ‘योग’च म्हणायला हवे. माझ्या भाग्यात होते, त्यामुळेच ‘माझी पावले, माझा वेळ, प्रवासातील वाटा, मैत्रिणीची साथ, आश्रमवासियांकडून झालेले स्वागत आणि माझा नृत्यातला अभ्यास’, या सर्व तारा जुळून आल्या अन् माझा खर्या अर्थाने ‘आश्रमयोग’ चालू झाला.
३. रामनाथी आश्रम पहातांना जाणवलेली सूत्रे
३ अ. आश्रमातील प्रत्येकाच्या तोंडवळ्यावर अत्यंत मोकळे आणि सुमधुर हास्य असणे : रामनाथी आश्रमात आल्यावर आश्रम पहात असतांना माझी एकेकाशी ओळख होत होती. प्रत्येकाच्या तोंडवळ्यावर अत्यंत मोकळे अन् साधे असे सुमधुर हास्य होते. ‘जो माणूस डोळ्यांतून हसतो, तो खरा !’, असे म्हणतात. येथे सर्वच मंडळी डोळ्यांतून हसत होती. त्यामुळे क्षणभर ‘आपण स्वप्नात आहोत का ?’, असे मला वाटले.
३ आ. साधकांमधील आपलेपणा आणि सहजता यांमुळे त्यांच्यामध्ये मन अडकल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगणे : अतिथीसेवा करणारी एक साधिका किरण (कु. किरण व्हटकर) अवघी २० वर्षांची आहे. लहान असूनही तिच्या बोलण्यात आणि वावरण्यात ‘आपलेपणा’ जाणवत होता. तिने ‘पाणी देऊ का ?’, असे विचारल्यावर मला नको असतांनाही ‘हो’ म्हणावेसे वाटायचे. तिच्या एका आपुलकीच्या प्रश्नालाही नाकारण्याची माझी इच्छा होत नव्हती. ती जणू आतिथ्यभावाचा खजिना उघडून बसली होती. त्यामुळे ‘काय आणि किती लुटू ?’, असे मला झाले होते. याविषयी माझा अनुभव सांगतांना मी परात्पर गुरु डॉक्टरांना म्हणाले, ‘‘प्रारंभी मला खरंच वाटत नव्हते आणि परिस्थिती हाताळता येत नव्हती. मी या लोकांमध्ये अडकून गेले.’’
३ इ. साधकांचे नियोजनकौशल्य पाहून त्यांना त्याविषयीचे शिक्षण घ्यायची आवश्यकता नसल्याचे लक्षात येणे : आश्रमात येण्यापूर्वी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर, कथ्थक नृत्य अभ्यासिका सौ. सावित्री इचलकरंजीकर या दोघी माझ्याशी दूरभाषवर बोलल्या होत्या. त्या वेळी मला त्यांच्यातील नियोजनकौशल्याची अल्पशी कल्पना आली होती; परंतु मी त्यांचे प्रत्यक्ष नियोजन पाहिले आणि मला त्यांचे कौतुक वाटले. ‘येथील प्रत्येक कक्षाचे कार्य त्या त्या क्षेत्रातील विधीवत् शिक्षण न घेताही इतक्या उत्तमरित्या पार पाडले जाते’, याचे मला कौतुक वाटले. येथील साधकांना नियोजनकौशल्याचे शिक्षण घ्यायची आवश्यकता नाही. ‘आश्रमात येणार्या पाहुण्यांचे काम उत्तमरित्या जाणून घेणे, त्यांचे योग्य आदरातिथ्य करणे, त्यांच्या वेळेचे नियोजन करणे’, या सर्व गोष्टींकडे मनापासून लक्ष दिले जाते. त्यामुळे ‘चूक होण्याची शक्यता नाही’, असे मला जाणवले.
३ ई. स्वागतकक्षाच्या बाहेर उभे राहिल्यावर ‘परिसर चहूबाजूंनी सर्वांना शुभाशीर्वाद देत आहे’, असे वाटणे : अधिवक्ता योगेश जलतारे यांनी मला अत्यंत मनापासून आश्रम दाखवला. त्यांनी मला आश्रमातील प्रत्येक ठिकाणची विस्तृत माहिती दिली. मी स्वागतकक्षाच्या बाहेरच्या परिसरात उभी असतांना ‘परिसर चहूबाजूंनी सर्वांना शुभाशीर्वाद देत आहे’, असे मला वाटले. त्या वेळी मी वार्याची एक सुंदर झुळूक अनुभवली.
३ उ. सिद्धिविनायकाची मूर्ती आणि तिला वाहिलेली फुले यांतून अर्चनाभक्तीचा उत्तम नमुना पहायला मिळणे : अधिवक्ता योगेश जलतारे यांनी मला प्रथम श्री सिद्धिविनायकाची मूर्ती दाखवली. येथील एकसंध आणि एकरंगी श्री गणेशमूर्ती पाहून मी स्तिमित (अवाक्) झाले. श्री गणपतिबाप्पाच्या अंगावरील सर्व अलंकार मी मनातल्या मनात पाहू लागले. त्या मूर्तीवर वाहिलेली ताज्या जास्वंदाची ६ फुले माझे लक्ष वेधून घेत होती. मूर्ती आणि फुले यांच्या योग्य रंगसंगतीतून अर्चनाभक्तीचा एक उत्तम नमुना मला पहायला मिळाला.
३ ऊ. स्वागतकक्षातील प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र, श्रीकृष्णाचे चित्र आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहून जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती
३ ऊ १. प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र
अ. त्यानंतर आम्ही स्वागतकक्षातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या मोठ्या छायाचित्रासमोर उभे राहिलो आणि त्यांना नमस्कार केला. त्या वेळी ‘मला काय होत आहे ?’, हे कळत नव्हते; परंतु ‘आतून काहीतरी हालत आहे’, असे मला जाणवले.
आ. ‘प.पू. भक्तराज महाराज यांनी माझ्याशी काहीतरी बोलावे’, अशी माझी आंतरिक इच्छा होती. ‘ते काहीतरी सांगू पहात आहेत आणि त्या सांगण्यात किती साधेपणा असेल !’, याची मला जाणीव होत होती.
इ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले प.पू. भक्तराज महाराज यांचेच विचार पुढे नेत आहेत’, हे ऐकल्यावर ज्याप्रमाणे घराणेदार संगीताचे सूर ऐकून मनःशांती लाभते, त्याप्रमाणे मला आश्वासक वाटले.
३ ऊ २. श्रीकृष्णाचे चित्र पाहून त्यात जिवंतपणा जाणवणे आणि भावजागृती होणे : त्यानंतर आम्ही भगवान श्रीकृष्णाच्या मोठ्या चित्रापाशी आलो. ते पहाताक्षणी माझ्या मनात विचार आला, ‘अरे ! तू इथे ?’ ते चित्र पाहून ‘या चित्राशी प्रत्यक्ष संवाद साधू शकतो, इतके हे जिवंत आहे’, असे मला वाटले आणि माझा भाव जागृत झाला. ‘माझा अनेक वर्षांपासूनचा मित्र (श्रीकृष्ण) अकस्मात् येथे काय करतोय ?’, असे मला वाटले. त्या वेळी मला आश्रमातील साधकांच्या साधनेचा प्रत्यय येऊ लागला. (‘आश्रमातील साधकांमधील भावामुळे श्रीकृष्णाचे चित्र सजीव झाले आहे’, असे सौ. सोनिया यांना जाणवले.’ – संकलक)
३ ऊ ३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहिल्यावर त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची उत्सुकता वाढणे : तेथेच जवळ संस्थेच्या कार्याविषयी माहिती सांगणार्या फलकावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र होते. ‘त्यांनी हे कार्य कधी चालू केले ? त्यांच्या कार्यामागील हेतू’, हे सर्व जाणून घेत असतांना माझी दृष्टी परात्पर गुरु डॉक्टरांच्या शांत, स्थिर, विचारी आणि बुद्धीमान तोंडवळ्यावर स्थिरावली अन् माझी त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची उत्सुकता वाढली.
३ ए. आश्रमातील लादीवर उमटलेला ‘ॐ’ आणि त्याच्या शेजारी उमटलेला अनिष्ट शक्तीचा तोंडवळा पाहिल्यावर मनातील चांगल्या अन् अनिष्ट शक्ती यांविषयीच्या शंकांचे निरसन होणे : ‘चांगल्या आणि वाईट शक्ती’ यांविषयी मी माझ्या मैत्रिणीच्या, म्हणजेच सुप्रियाच्या (सुश्री सुप्रिया नवरंगे हिच्या) तोंडून अनेकदा ऐकले होते; परंतु ‘हे नेमके काय असते ?’, हे मला कळले नव्हते. आश्रमातील भूमीवर उमटलेला ‘ॐ’, तसेच देवत्वाचे अस्तित्व मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आणि भूमीवर उमटलेला वाईट शक्तीचा तोंडवळाही पाहिला. साधारणपणे ६ – ७ वर्षांपूर्वी माझ्या मनात ‘स्वर्गाकडे पोचवणारे ७ स्तर आणि नरकाकडे पोचवणारे ७ स्तर’, यांविषयीचे विचार येत होते. त्या वेळी नरकातील विश्व उभे करतांना तेथील ‘तोंडवळे कसे असतील ? तेथील संगीत बेसूर असेल कि भेसूर ?’, असे प्रश्न मला पडले होता. आश्रमातील भूमीवर ‘ॐ’च्या बाजूला उमटलेला वाईट शक्तीचा तोंडवळा पाहिल्यावर मी अस्वस्थ झाले आणि त्या अस्तित्वाने स्तिमित (अवाक्) झाले. ‘नरकसृष्टीतला तोंडवळा असाच असला पाहिजे’, अशी माझी निश्चिती झाली.
३ ऐ. आश्रम पाहिल्यावर तेथे चालणार्या कार्याची व्यापकता लक्षात येणे : त्यानंतर वाचनकक्ष, भोजनकक्ष, दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्यालय, कलेशी संबंधित कक्ष, संग्रहालय (सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन) असे एकेक कक्ष पहातांना येथील कार्याच्या व्यापकत्वाची मला प्रतीती (अनुभव) आली.
४. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने नृत्यासंबंधी घेण्यात आलेल्या प्रयोगांच्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
४ अ. प्रेक्षकांना रसनिष्पत्तीच्या आनंदयात्रेला घेऊन जाण्याचा स्वर्गीय आनंद अनुभवणे : आश्रमात आल्यानंतर दुसर्या दिवसापासून माझ्या नृत्याच्या प्रयोगांना प्रारंभ झाला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे वैज्ञानिक चाचण्या घेण्यात आल्या. यात माझ्या नृत्यासंबंधी विविध प्रयोग घेण्यात आले. संपूर्ण सिद्धता करून मी नृत्य करण्यासाठी स्टुडिओत (चित्रीकरण कक्षात) प्रवेश केला. तेव्हा एक वेगळीच लहर माझ्या अंगातून गेल्याचे मला जाणवले. तेथे अत्यंत शांत, स्थिर आणि माझी मनापासून वाट पहाणार्या अनेक नजरांचा (नेत्रांचा) मी अनुभव घेतला. या प्रेक्षकांना माझ्याकडून कोणतीच अपेक्षा नव्हती. त्यांच्या मनात तुलना नव्हती किंवा त्यांची परीक्षकाची भूमिकाही नव्हती. त्यांच्या साधेपणामुळे माझ्या मनावर एक वेगळेच दडपण आले होते. प्रेक्षकांकडून टाळ्या नव्हत्या, कुठेही आरडाओरड नव्हती किंवा कोलाहलही नव्हता; परंतु तरीही एका निरभ्र शांततेत व्यक्तीला आपलेसे करण्याची शक्ती असते, ती मला तेथे जाणवली. कलाविष्कारात (नृत्याविष्कारात) म्हणतात, ‘नर्तक प्रत्येक प्रेक्षकाला रसनिष्पत्तीच्या आनंदयात्रेला घेऊन जातो आणि त्या स्वर्गीय ठिकाणी दोघेही (नर्तक अन् प्रेक्षक) आनंदात न्हाऊन निघतात.’ हा क्षण मी खर्या अर्थाने जगले. (I lived the moment.)
४ आ. प्रयोगाच्या वेळी सौ. सोनिया यांना जणू एखाद्या पठारावर मुक्तपणे संचार करायला जात असल्याप्रमाणे वाटणे आणि एका साधकाने अन् त्यांनी एकमेकांकडे पाहिल्यावर त्या दोघांचीही भावजागृती होणे : प्रयोगाच्या वेळी ‘मी जणू एखाद्या सुंदर मोकळ्या पठारावर हुंदडायला गेले आहे’, असे मला वाटले. त्या पठाराने एका क्षणात मला आपलेसे केले. अशा पठारावर हुंदडतांना ‘कुठलीही चांगली गोष्ट पायदळी तुडवली जाणार नाही ना ? निसर्गदत्त उमललेली नाजूक फुले फटकारली जाणार नाहीत ना ? निवांत विहार करणार्या जिवांना त्रास होणार नाही ना ?’, याचे भान ठेवायचे असते. या सर्व विचारांनिशी मी रंगमंचावर प्रवेश केला. त्या वेळी पहिल्या रांगेत आसंदीवर बसलेल्या एका साधकाने माझ्याकडे पाहिले आणि मीही त्यांच्याकडे पाहिले. त्या वेळी त्याचे आणि माझे डोळे क्षणार्धात भरून आले अन् आमची भावजागृती झाली. या वेळी मला ‘Soulmate म्हणजे नक्की काय असू शकते ?’, याची प्रतीती (अनुभव) आली. त्या साधकाचे नाव श्री. गिरिजय प्रभुदेसाई ! तो तबलावादक आहे. नंतरच्या प्रयोगांना गिरिजयने मला तबल्यावर साथसंगतही केली. त्यानंतर मी आश्रमजीवनात रुळले अन् एकामागोमाग एक प्रयोग करतच गेले.
४ इ. प्रयोगामुळे अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळणे : प्रत्येक प्रयोगाआधी आणि प्रयोगानंतर माझे अन् काही निवडक साधकांचे ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे वैज्ञानिक चाचणीसाठी परीक्षण घेतले जात होते. अशा अनेक नवनवीन गोष्टी मला कळत होत्या. काही गोष्टी माझ्याविषयी होत्या, तर काही गोष्टी या रसास्वादाविषयी होत्या. एकंदरीत हा सर्व अनुभव विलक्षण होता.
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अविस्मरणीय भेट !
५ अ. परात्पर गुरुदेवांच्या भेटीची इच्छा मनात येताच त्याच दिवशी संध्याकाळी त्यांची भेट होणे : या सर्व मंथनात सुश्री (कु.) तेजल पात्रीकर, सौ. सावित्री इचलकरंजीकर आणि माझी मैत्रीण सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे या तिघी सतत माझ्या समवेत होत्या. त्या मला सांभाळत होत्या. त्या माझ्याविषयी जाणून घेऊन मला बोलते करत होत्या. त्याच ओघात मी तेजलला विचारले, ‘‘मला परात्पर गुरु डॉक्टर भेटतील का गं ? मला त्यांना भेटायचं आहे.’’ त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी माझी त्यांच्याशी भेट झाली. परात्पर गुरु डॉक्टरांची प्राणशक्ती अल्प आणि प्रकृती अस्वास्थ्य असतांनाही त्यांची प्रत्यक्ष भेट होणे, हा आश्रमातील वास्तव्यातील शिखराचा कालावधी होता.
५ आ. परात्पर गुरु डॉक्टरांचे प्रथम दर्शन झाल्यावर डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागणे आणि त्यांचा साधेपणा अन् सहजता मनाला भावणे : परात्पर गुरु डॉक्टरांना पहाताक्षणीच माझे हृदय बोलू लागले आणि माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांचा संपूर्ण पोशाख पांढरा होता. ना कुठला अलंकार, ना अतिरिक्त पोशाख, ना कुठला अभिनिवेष (अहंकार) ! एक अखंड पावित्र्य माझ्यासमोर अवतरले होते. ‘प्रचंड बुद्धीमत्ता, सखोल अभ्यास, नामजपाने आलेले तेज, ध्यानातून सापडलेले तत्त्व आणि आजूबाजूला वावरत असलेली तरुण ऊर्जा’, या सर्व अलंकारांनी सजलेला एक तेजस्वी ज्योतीर्मयस्वरूप; हालचाल करत असूनही ध्यानस्थ भासणारा एक ज्ञानसूर्य माझ्यासमोर प्रगटला होता.
५ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले शांतपणे आणि एकाग्रपणे सौ. सोनिया यांचे बोलणे ऐकत असल्याने भारावून जाणे अन् त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलता येणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अत्यंत प्रेमाने माझे स्वागत केले. त्यांनी माझी विचारपूस केली आणि मला माझे अनुभव विचारले. ‘एवढा मोठा माणूस शांतपणे आणि एकाग्रतेने माझे म्हणणे ऐकत आहे’, या विचारानेच मी भारावून गेले. मला प्रथम थोडे शब्द जमवावे लागले; परंतु त्यांनी स्वतःहून ‘तुमच्या भाषेत सांगा’, असे म्हटल्यावर मी मोकळेपणाने त्यांच्याशी बोलू लागले. मला जे जे वाटले, ते ते मी प्रामाणिकपणे त्यांना सांगितले. ते शांतपणे माझ्याशी बोलत होते आणि माझे ऐकत होते.
५ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःविषयी एकही शब्द न बोलणे : ‘या व्यक्तीने स्वतःवर प्रचंड विजय मिळवला आहे’, असे मला वाटले. याचे सर्वांत मोठे लक्षण, म्हणजे या संपूर्ण कालावधीत ते स्वतःविषयी एकही शब्द बोलले नाहीत. त्यामुळे मला ‘ते खरोखरच किती मोठे आहेत !’, याची जाणीव झाली.
५ उ. ‘मी माझ्या कामात अजून काय करू शकते ?’, हे त्यांनी सांगितले; परंतु हे सांगतांनाही त्यांनी समोरच्या व्यक्तीच्या विषयावर अतिक्रमण न करता शांतपणे विचारांची बैठक मांडली.
५ ऊ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आगामी पिढ्यांसाठी नृत्याविषयीचे प्रयोगात्मक ग्रंथ लिहिण्यास प्रेरित करणे : त्यांनी अत्यंत मनापासून माझ्या कामाची ओळख करून घेतली आणि मला लिखाणासाठी प्रवृत्त केले. त्यांच्या या पाठिंब्यानेच मी हा लेख लिहायला आरंभ केला आहे. ‘आगामी पिढ्यांसाठी तुम्ही नृत्यावर आधारित ग्रंथ लिहिला पाहिजे. तुम्हाला नृत्याविषयी जे जे प्रयोगात्मक वाटते, ते लिहून काढा’, हे त्यांचे बोल ऐकल्यावर ‘छत्रपतींच्या राज्यातील शिलेदाराची उर्मी’ माझ्या अंगात आल्याचे मला जाणवले. ‘तुम्हाला साहाय्य लागल्यास मुंबईतील साधक साहाय्य करतील.’ असे म्हणून ते थांबले नाहीत, तर त्यांनी लगेचच उपस्थित साधकांना त्याविषयीचे नियोजन होऊ शकते का पहाण्यास सांगितले. त्यांनी त्यांच्या दृष्टीतूनच मला हिरवा कंदील दिला, ‘चालू कर’ आणि ही लेखणी माझ्या हातात आली. हे सर्व लेखनकार्य मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना समर्पित करते आणि माझ्या या ग्रंथाविषयीच्या लेखनकार्याला आरंभ करते. श्रीराम !
– सौ. सोनिया अतुल परचुरे, दादर, मुंबई. (९.१.२०२२)