शुक्रवारच्या नमाजपठणासाठी विधानसभेचे कामकाज थांबवण्याची मुसलमान आमदारांची मागणी विधानसभा अध्यक्षांनी नाकारली !
|
|
पाटलीपुत्र (बिहार) – बिहार विधानसभेमध्ये शुक्रवार, ११ मार्च या दिवशी एम्.आय.एम्.चे आमदार अख्तरुल इमान आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार महबूब आलम यांनी नमाजपठण करायचे असल्याने सभागृहाचे कामकाज दुपारी साडेबारा वाजेपर्यंतच चालवण्याची मागणी केली. या मागणीला काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल याच्या आमदारांनीही पाठिंबा दिला. या वेळी विधानसभा अध्यक्ष नमाजपठणासाठी सभागृहाचे कामकाज बंद न करण्यावर ठाम राहिल्याने विरोधी पक्षांनी गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज १४ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आले.
१. विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांनी ‘शुक्रवारच्या नमाजपठणासाठी कामकाज थांबवण्यात येऊ शकत नाही. ज्यांना नमाजपठण करायचे आहेत, ते सभागृहाबाहेर जाऊन पठण करू शकतात’, असे म्हटले आहे. त्यावर आमदार आलम आणि इमान यांनी विरोध केला आणि ‘ही सभागृहाची जुनी परंपरा आहे’, असे सांगितले.
२. त्यावर विधानसभेचे अध्यक्ष सिन्हा म्हणाले की, परंपरा आणि नियम काळानुसार पालटले जाऊ शकतात. ज्यांना नमाजपठण करायचे आहे, त्यांना यापूर्वीच सभागृहात बोलण्यास देण्यात आलेले आहे.’ यानंतर विरोधी पक्षांनी गदारोळ केल्याने कामकाज स्थगित करण्यात आले.