श्री जोतिबा देवाच्या मंदिराची चारही द्वारे खुली करण्यासाठी, तसेच ‘ई-पास’ बंद होण्यासाठी जोतिबा डोंगरावर बेमुदत आंदोलनास प्रारंभ !

श्री जोतिबा देवाची ११ मार्च या दिवशी केलेली पूजा

जोतिबाडोंगर (जिल्हा कोल्हापूर), ११ मार्च (वार्ता.) – श्री जोतिबा मंदिरातील चारही द्वारे उघडून ‘ई-पास’ सुविधा बंद करावी, या मागणीसाठी जोतिबा डोंगर येथे ११ मार्च या दिवशी सकाळी १० वाजल्यापासून बेमुदत धरणे आंदोलन चालू करण्यात आले आहे. या आंदोलनात डोंगरावरील व्यापारी, दुकानदार यांनी दुकाने बंद ठेवून पाठिंबा घोषित केला आहे. या आंदोलनात सर्व हक्कदार पुजारी, गुरव समाज, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत.

ई-पाससाठी भर उन्हात रांग लावलेले भाविक
श्री जोतिबा डोंगरावर आंदोलन करणारे आंदोलक पुजारी, गुरव आणि ग्रामस्थ

या संदर्भात श्री. गोरख बुणे म्हणाले, ‘‘राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग अल्प झाल्यावर बंधने शिथिल करण्यात आली आहेत. त्यात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे; मात्र जोतिबा देवस्थान संदर्भात बंधने शिथिल करण्यास प्रशासन सिद्ध नाही. ‘ई-पास’, तसेच द्वार बंद असल्याने भाविकांची दर्शन घेण्यासाठी कुचंबणा होत आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. ‘ई-पास’मुळे भाविकांना काय लाभ होतो ? हे प्रशासनाने सांगितले पाहिजे. प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य न केल्यास यापुढील काळात यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल.’’

या वेळी श्री. विष्णुपंत दादर्णे, उपसरपंच श्री. शिवाजीराव सांगळे, सौ. राधा कृष्णात बुणे, गावचे मानाचे गावकर श्री. शंकर दादर्णे, जोतिबा देवाचे पुजारी श्री. नवनाथ मिटके, श्री. सुरज ढोली यांच्यासह समस्त जोतिबा डोंगरावरील पुजारी उपस्थित होते.