कुलदेवतेची उपासना करणे, ही धर्मशास्त्रानुसार साधनेची पहिली पायरी ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) – कलियुगामध्ये नामस्मरण ही काळानुसार साधना आहे. आपण नियमितपणे भगवंताचे नामस्मरण केले, तर आपले मन आणि बुद्धी यांच्या शुद्धीची प्रक्रिया प्रारंभ होते. आपण ज्या कुळात जन्म घेतला, त्या कुळाच्या कुलदेवतेच्या नामस्मरणामुळे स्वतःची आध्यात्मिक आणि व्यावहारिक उन्नती होते. कुलदेवतेची उपासना करणे, ही धर्मशास्त्रामध्ये साधनेची पहिली पायरी सांगितली आहे. कुलदेवतेचे नामस्मरण केल्याने नामधारकाचे मूलाधारचक्र जागृत होऊन कुंडलिनीचे उर्ध्व दिशेने मार्गक्रमण चालू होते. यासाठी नियमितपणे कुलदेवतेची उपासना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. येथील तारागंजच्या टेकडीवाले हनुमान मंदिरामध्ये ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर आयोजित केलेल्या प्रवचनामध्ये ते मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमाचे आयोजन धर्मप्रेमी श्री. संतोष चाळीसगांवकर यांनी केले होते. या कार्यक्रमाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.

क्षणचित्रे

१. श्री. संतोष चाळीसगांवकर यांनी सत्संगाची पूर्वसिद्धता अतिशय भावपूर्ण केली. त्यामुळे मंदिराच्या स्वच्छतेनंतर दिवाळीसारखे वातावरण निर्माण झाले होते.

२. सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या सत्संगासाठी धर्मप्रेमी श्री. सुरेंद्र त्रिपाठी हे ४० किलोमीटर लांब असलेल्या मुरैना येथून आले होते.

३. येथील जिज्ञासू मधू सिंघल यांनी प्रवचनानंतर ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’ ‘डाऊनलोड’ केले आणि त्यावरील मंत्रजप ऐकणे चालू केले, तसेच श्रीमती भिडे यांनीही नामजप करण्यास प्रारंभ केला.

४. मंदिराच्या बाहेरून दर्शन घेऊन जाणार्‍या अनेक जिज्ञासूंना प्रवचनाची माहिती सांगण्यात आली. त्यानंतर अनेकांनी संपूर्ण प्रवचन ऐकले, तसेच सनातनच्या सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शनाचाही लाभ घेतला.