युक्रेनचा ‘गनिमी कावा’ आणि रशियाची पालटणारी युद्धनीती !
रशिया-युक्रेन युद्धाला १६ दिवस होत आले आहेत आणि हा संघर्ष अधिकाधिक तीव्र होत आहे. युक्रेनचे सैन्य रशियाच्या मोठ्या सैन्याच्या विरोधात कोणती रणनीती वापरत आहे ? आणि रशियाने युद्धनीतीमध्ये काय पालट केला आहे ? याविषयी जाणून घेऊया.
१. युक्रेनच्या सैन्याने ‘गनिमी कावा’ वापरून रशियाच्या विरोधात यश मिळवणे
‘रशियाला युक्रेनची अधिक हानी करायची नव्हती. त्यामुळे प्रारंभी रशियाचे सैन्य केवळ क्षेपणास्त्रांचा वापर करत होते. आता त्यांनी युक्रेनच्या शहरांना वेढा दिला आहे. त्यामुळे रशियाच्या सैन्याच्या सुरक्षेसाठी कुणी नसते, तेव्हा युक्रेनचे सैन्य त्यांच्यावर आक्रमण करते. अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘गनिमी कावा’ वापरून ते रशियाच्या सैन्यावर आक्रमण करत आहेत. युक्रेनचे सैन्य या आक्रमणांच्या चित्रफिती सिद्ध करून त्या प्रसारित करत आहे. यातून त्यांचा दावा किती खरा आहे, हे लोकांना दिसून येत आहे. युक्रेनी सैन्याच्या ‘गनिमी काव्या’मुळे रशियाच्या सैन्याला कीव शहरात आगेकूच करणे अद्याप शक्य झाले नाही. तसेच युद्धाला १६ दिवस लोटूनही त्यांना युक्रेनच्या अनेक शहरांवर ताबा मिळवता आला नाही. युक्रेनच्या सैन्याला ‘गनिमी काव्या’मुळे यश मिळत आहे.
२. युक्रेन मधील शहरांना लवकर कह्यात घेण्यासाठी पुतिन यांनी रशियाच्या सैन्यावर दबाव टाकणे
रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या शहरांना चारही बाजंनी वेढले आहे. ते प्रतिदिन युक्रेनच्या शहरांना उद्ध्वस्त करत आहेत. रशियाच्या सैनिकांना प्रत्येक इमारतींच्या आत घुसून त्यांच्या सैनिकांना मारणे रशियाला जमलेले नाही. त्यामुळे ते केवळ शस्त्रांच्या साहाय्याने लढाई जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत.
या युद्धात युक्रेनचे सैन्य वरचढ ठरत आहे; कारण त्यांचे राष्ट्रपती झेलेंस्की हे पुढे राहून नेतृत्व करत आहेत. युक्रेनने ड्रोनचा वापर केल्यामुळे त्यांना थोडेफार यश मिळत आहे. ज्याप्रमाणे अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्या लढाईमध्ये अझरबैजानला ड्रोनमुळे यश मिळाले होते, तसे अपेक्षित यश अद्याप कुणालाही मिळालेले नाही. आता ‘युक्रेनच्या कीव या राजधानीवर लवकरात लवकर आक्रमण करा’, असे सांगत रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी त्यांच्या सैन्यावर दबाव टाकायला प्रारंभ केला आहे. यामुळे येणार्या काळात रशियाचे सैन्य मोठ्या प्रमाणात आर्टलरीचा (तोफखान्यांचा) वापर करून कीव शहराला कह्यात घेण्याचा प्रयत्न करील.