हिंदुद्वेषी ‘अल्-जजीरा’ !
जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा बिघडवण्याचे ‘अल्-जजीरा’चे षड्यंत्र जाणा !
Hardline Hindu monk’s stock rises as BJP wins key Indian state
Incumbent Yogi Adityanath set to deliver the right-wing party a thumping election win in Uttar Pradesh, India’s most populous state.
भारतातील ५ राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल १० मार्च या दिवशी घोषित झाला. ५ पैकी ४ राज्यांमध्ये भाजपचा विजयरथ आघाडीवर आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घवघवीत यश मिळाले. हिंदुत्व विजयी झाल्याने ही घटना तेथील हिंदूंसाठी निश्चितच आशादायी ठरली आहे. अर्थात्च या हिंदुत्वाचा जल्लोष तेथे साजरा झाला. हिंदु, हिंदुत्व आणि हिंदु देवता यांच्याविषयी एखादी सकारात्मक घटना घडल्यावर हिंदुत्वद्वेष्ट्यांना पोटशूळ उठला नाही, तरच नवल ! मग काय हिंदुत्वविरोधी गरळओक करण्यात पुढाकार घेतला जातो, त्या चर्चेत आपोआप विरोधकांच्या उड्या पडतात. उत्तरप्रदेशातील भाजपचे अर्थात् हिंदुत्वाचे यश यातून कसे काय सुटेल ? आखाती देशांतील हिंदुद्वेष्ट्या ‘अल्-जजीरा’ या वृत्तवाहिनीने तिच्या संकेतस्थळावर ‘कट्टरतावादी हिंदु साधूची राजकीय शक्ती वाढली’, असा मथळा देऊन एक लेख प्रकाशित केला आहे. खरे पहाता भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये नाक खुपसण्याचा ‘अल्-जजीरा’ला अधिकारच काय ? केवळ हिंदुद्वेषापोटीच अशी विधाने केली जातात. प्रत्येक वेळी हिंदूच ‘कट्टरतावादी’ असतात, ‘आतंकवादी’ही हिंदूंच ठरतात; कारण हिंदुद्वेष सर्वत्र भिनलेला आहे. तो केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण विश्वातही पसरला आहे. त्यामुळे भारतातील निवडणुकांच्या निकालावर अशा प्रकारे विदेशी वृत्तवाहिन्यांकडून भाष्य केले जाते. ‘योगी आदित्यनाथ यांच्यामुळे हिंदू आणि हिंदुत्व यांना चांगले दिवस येऊन भविष्यात ते पंतप्रधान होऊ शकतात’, असे सर्वांच्याच मनात आहे आणि हेच हिंदुद्वेष्ट्यांना खुपते. त्यांना ते नको आहे. मागील १ सहस्र वर्षे परकीय आक्रमक भारताचे इस्लामीस्तान करण्यासाठी प्रयत्न करत आहेत; मात्र ते त्यांना जमलेले नाही. ते प्रत्येक वेळी भारताला खाली खेचण्याची संधी शोधत असतात; पण हिंदुत्व प्रत्येकाच्या मनामनात ठासून भरले आहे. त्यामुळे ते कुणाच्याही टीकेने, विरोधाने किंवा आक्रमणाने कदापि नष्ट होणार नाही, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे.
भारतविरोधी षड्यंत्र !
‘अल्-जजीरा’ ही वृत्तवाहिनी जरी आखाती देशांतील असली, तरी तिच्याकडून याही आधी अनेकदा भारतद्वेषी विधाने करण्यात आलेली आहेत. या वृत्तवाहिनीने वर्ष २०१५ मध्ये भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखवला होता. त्यात जम्मू-काश्मीर, विशेषतः पाकव्याप्त काश्मीर आणि भारतातील अक्साई चीन यांचा काही भाग दाखवलाच नव्हता. लक्षद्वीप आणि अंदमान ही बेटे भारताचा भाग असूनही त्यांचा तसा उल्लेख केलेला नव्हता. भारताच्या सर्वेक्षणाच्या ‘कॉपीराईट’ नकाशाचेही वाहिनीने पालन केले नाही. संरक्षण मंत्रालयाचे धोरण आणि वर्ष २००५ मधील भारताचे राष्ट्रीय नकाशा धोरण यांच्या विरोधातील हे कृत्य होते. त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाने ‘अल्-जजीरा’ला दोषी ठरवून ५ दिवस भारतभर प्रसारण करण्यास बंदी घालण्याची शिक्षाही दिली होती. यातूनही शिकून शहाणे न झालेल्या वाहिनीने वर्ष २०१७ मध्ये ‘काश्मीरचा वाद निर्माण करणारा नरसंहार विसरण्यात आला’ या शीर्षकाचा लेख प्रकाशित केला.
‘डोगरा शासक हरि सिंह यांच्या कारकीर्दीत जम्मूमध्ये सुरक्षादलांनी सहस्रो मुसलमानांना मारले’, असे त्या लेखात म्हटले होते. अमृतसरमधील एका कुटुंबाचे चित्रही त्यात वापरण्यात आले होते. प्रत्यक्षात ते कुटुंब लाहोर येथे स्थलांतरित झालेले होते. त्याचा जम्मू-काश्मीरशी काहीही संबंध नव्हता. अशा प्रकारे खोट्या बातम्या पसरवून जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा बिघडवण्याचे जाणीवपूर्वक षड्यंत्र आणि भारतद्वेषाचे बीजच रुजवले जात आहे, हे वेगळे सांगायला नको. ‘मुसलमानांवर अन्याय करणारा देश भारत’, अशी भारताची कुप्रसिद्धी करण्याची एकही संधी ‘अल्-जजीरा’ सोडत नाही. या वाहिनीने काश्मीरविषयी एक स्वतंत्र पृष्ठ सिद्ध केले असून तेथे भारत खलनायक कसा आहे? याचे चित्रण केले जाते. पानेच्या पाने भरून काश्मीरविरोधी लिखाण केले जाते. मध्यंतरी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती, तेव्हा ‘अल् जजीरा’ वृत्तवाहिनीसह अनेक विदेशी प्रसारमाध्यमांना त्यांच्या भेटीचा पोटशूळ उठला. पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना ‘नागरिकत्व सुधारणा विधेयका’विषयी (सीएए) प्रश्न विचारले होते. त्यासंदर्भात वाहिनीने म्हटले, ‘‘ट्रम्प यांना ‘सीएए’विषयी विचारणे योग्यच नाही. काश्मीरच्या सूत्रावर मध्यस्थीची भूमिका स्वीकारण्यासाठी सिद्ध असलेले ट्रम्प स्वतः ‘इस्लामविरोधी’ आहेत. त्यामुळे त्यांना योग्य-अयोग्य काहीच कळत नाही.’’ एखाद्या देशाच्या पंतप्रधानांनी जगातील मोठ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला कोणता प्रश्न विचारावा किंवा विचारू नये, हे विदेशातील वृत्तवाहिनीला ठरवण्याचा काय अधिकार ? मध्यंतरी देहली येथे धर्मांधांनी दंगल घडवून आणलेली असतांनाही ती अल्पसंख्यांकांच्या विरोधात घडवली गेल्याचे वाहिनीने एकतर्फी वृत्तांकनाद्वारे प्रसिद्ध करून सर्वांची दिशाभूल केली. त्या वृत्तात ‘अल्-जजीरा’ने म्हटले, ‘‘भारताच्या राजधानीत मशिदींना आग लागली. पोलिसांनी मुसलमानांवर आक्रमणे करण्यात आणि त्यांच्या मालमत्तेला आग लावण्यात साहाय्य केले.’’ थोडक्यात काय, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘मुसलमानविरोधी देश’ म्हणून भारताची विद्वेषी ओळख करून देण्याचा ‘अल्-जजीरा’चा कुटील डाव आहे. ही वृत्तवाहिनी ‘अल्-कायदा’चे मुखपत्र आहे, असे म्हटले जाते. मुस्तफा सौहाग हे वृत्तवाहिनीचे महासंचालक आहेत. त्यांनी प्रत्येक वेळी इस्लामि कट्टरतावादालाच पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे भविष्यात असेच होत रहाणार, हे निश्चित ! भारत सरकारने ‘अल्-जजीरा’ची काळी बाजू वेळीच लक्षात घेऊन तिच्या प्रसारणावर कायमस्वरूपी बंदी घालायला हवी. अर्थात् बंदी घातल्यावर कट्टर धर्मांध डॉ. झाकीर नाईक याच्या ‘पीस (शांती) टीव्ही’प्रमाणे तिचे अवैध प्रसारण होऊ नये, याकडेही लक्ष द्यावे लागेल. इस्लामी महत्त्वाकांक्षेच्या बळावर भारताची अपकीर्ती करणार्या ‘अल्-जजीरा’ला रोखठोक प्रत्युत्तर देण्याची वेळ आता आली आहे. तसे झाल्यासच अन्य विदेशी प्रसारमाध्यमांकडून केल्या जाणार्या भारतविरोधी वृत्तांकनाला आळा बसेल !