निधीच्या उपलब्धतेनुसार अकोट (जिल्हा अकोला) ग्रामीण पोलीस ठाणे आणि पोलीस वसाहतीचे बांधकाम करणार ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री
विधान परिषद कामकाज तारांकित प्रश्न
अकोला, ११ मार्च (वार्ता.) – पोलीस गृहनिर्माण महामंडळास प्राप्त झालेल्या एकूण बांधकाम प्रस्तावांचा प्राधान्यक्रम आणि निधीची उपलब्धता प्राप्त करून देण्याविषयी, तसेच राज्यातील निवासी अन् प्रशासकीय इमारतींचा बांधकाम प्राधान्यक्रम सिद्ध करून शासकीय मान्यतेसाठी सादर केला आहे. या प्राधान्यक्रमात अकोट येथील ग्रामीण पोलीस ठाणे आणि पोलीस वसाहत बांधकाम प्रकल्पांचा समावेश आहे. प्राधान्यक्रम आणि निधीच्या उपलब्धतेनुसार अकोट ग्रामीण पोलीस ठाणे अन् पोलीस वसाहतीचे बांधकाम करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधान परिषदेमध्ये दिली.
७ मार्च या दिवशी आमदार अमोल मिटकरी यांनी अकोट येथील ग्रामीण पोलीस ठाणे आणि पोलीस वसाहतीच्या नवीन इमारतीविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर गृहमंत्री वळसे पाटील यांनी वरील लेखी उत्तर दिले आहे.
अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याविषयी पोलीस विभागास जागा उपलब्ध करून देण्यासाठी वर्ष २०१५ पासून पत्रव्यवहार चालू आहे. पोलीस ठाणे इमारत आणि पोलीस वसाहत यांसाठी अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी १५ मार्च २०१८ या दिवशी जिल्हाधिकारी यांना पत्राने कळवले आहे. हिच जागा निश्चित करण्याविषयी अकोला पोलीस अधीक्षक यांनीही २७ मार्च २०१८ या दिवशी अकोला जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे. ७ फेब्रुवारी २०१९ या दिवशी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून पोलीस गृहनिर्माण महामंडळास अकोट येथे पोलिसांसाठी वसाहत आणि ग्रामीण पोलीस ठाणे बांधकाम करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.